कोणत्याही भाजीची, उसळीची ग्रेव्ही करायची असो किंवा एखाद्या पदार्थाला आंबटसर चव आणायची असो आपण टोमॅटोचा यासाठी आवर्जून वापर करतो. टोमॅटोची कोशिंबीर, चटणी, सॅलेड म्हणून आपण सर्रास टोमॅटो खातो. टोमॅटोने ग्रेव्हीला घट्टपणा येण्यास आणि पदार्थाला चव येण्यास मदत होत असेल तरीही टोमॅटो जास्त प्रमाणात खाणे आरोग्यासाठी चांगले नाही. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे टोमॅटोमध्ये जास्त प्रमाणात बिया असतात. या बिया आपल्या आरोग्यासाठी चांगल्या नसतात. टोमॅटो या भाजीची नाईटशेड प्लांटसमध्ये विभागणी केली जाते. याचा अर्थ या भाजीमध्ये काही प्रमाणात केमिकल्स असतात. या प्रकारात बटाटे, शिमला मिरची, वांगी यांसारख्या आणखी काही भाज्याही येतात. हे केमिकल्स जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास त्यापासून शरीरात एकप्रकारचे विषारी घटक तयार होण्याची शक्यता असते. डॉ. वरलक्ष्मी यांनी याबाबत अतिशय महत्त्वाची माहीती सांगितली असून टोमॅटो का घातक असतो ते समजून घेऊया (Know How seeds in Tomatos are not good for health).
टोमॅटोच्या आरोग्यासाठी घातक असतात कारण...
१. टोमॅटोसारख्या भाज्यांमध्ये लाइकोपीन आणि इतर पोषक तत्वांचा समावेश असतो. त्यात सोलॅनिन किंवा टोमॅटिन सारखे अल्कलॉइड्सही असतात. अल्कलॉइड हे वनस्पतीद्वारे सोडले जाणारे एक शक्तिशाली रसायन आहे, ज्यामुळे भाजीचे कीटकांपासून संरक्षण होण्यास मदत होते. हे अल्कलॉइड दाहक आणि प्राण्यांसाठी विषासारखे असतात. ते बटाट्याच्या कातडीत आढळतात, तसेच वनस्पतीचे स्टेम आणि पाने यामध्येही ते मोठ्या प्रमाणात असतात.
२. याशिवाय टोमॅटोच्या बियांमध्ये लेक्टिन हे प्रोटीन असते जे इतर पोषक घटकांना चिकटून राहते आणि सेल्युलर डिसफंक्शनला कारणीभूत ठरते. लॅक्टीनमुळे आतड्याला त्रास होऊ शकतो तसेच त्यातील आम्ल दाहक असल्याने त्याचाही त्रास होऊ शकतो.
३. जर तुम्हाला संधिवात किंवा इतर कोणताही स्वयंप्रतिरोधक रोग असेल तर या नाईटशेड प्रकारातील भाज्यांचे जास्त सेवन करणे टाळावे, कारण त्यामुळे जळजळ आणि वेदना वाढण्याचीच शक्यता जास्त असते.
मग यावर उपाय काय?
शक्यतो टोमॅटो कमीत कमी प्रमाणात खायला हवा, अगदीच आवश्यक असेल तेव्हा टोमॅटोच्या बिया काढून टोमॅटो खायला हवेत. म्हणजेच टोमॅटोच्या आतला बियांचा बाग काढून फक्त त्यावर असलेले जाडसर आवरण खायला हवे. तेव्हा स्वयंपाक करताना आणि आपल्या कुटुंबातील मंडळींच्या आरोग्याची काळजी घ्यायची असेल तर या गोष्टी अवश्य लक्षात ठेवा.