ॲसिडीटी ज्यांना होते त्यांनाच त्यामागचा त्रास काय असतो ते माहित असते. एकदा ॲसिडीटी झाली की अक्षरश: काहीच सुधरेनासे होते. सुरुवातीला साधी वाटणारी ही समस्या हळूहळू वाढत जाते आणि मग डोकेदुखी, जळजळ, उलट्या असे त्रास होतात. दिवसभरात आपण खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचतेच असे नाही. बैठी जीवनशैली तर कधी व्यायामाचा अभाव यांमुळे अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. न पचलेले अन्न शरीर एकतर बाहेर टाकते किंवा ते शरीरात एकप्रकारे कुजते. खाल्लेल्या अन्नाचे योग्य पद्धतीने पचन झाले नाही तर त्यामुळे अपचनाच्या तक्रारी उद्भवतात (1 Easy Home Remedy for Acidity Problem).
ॲसिडीटीचा त्रास घरोघरी अनेकांना सतावत असल्याचे दिसते. यामागे अपचन हेच महत्त्वाचे कारण असते. झोप पूर्ण न होणे, व्यसनाधिनता यांसारख्याही बऱ्याच गोष्टी कारणे ॲसिडीटीला कारणीभूत असतात. ॲसिडीटीचा त्रास सहन न होण्याइतपत वाढला की आपण एकतर मेडीकलमध्ये जाऊन औषधे घेतो नाहीतर काही ना काही घरगुती उपाय करतो. पण त्याने आराम मिळतोच असे नाही. असाच एक अतिशय सोपा आणि घरगुती उपाय आज आपण पाहणार आहोत. घरात सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टींपासून हा उपाय होत असल्याने तो करणेही सहज शक्य आहे.
१. अर्धा चमचा खडीसाखर आणि एक चमचा बडीशेप घ्यायची.
२. एका वेलचीची वेलची पूड आणि चिमूटभर काळे मीठ घ्यायचे.
३. साधारण १०० एमएल पाणी उकळत ठेऊन त्यामध्ये बडीशेप आणि वेलची पावडर घालून ते चांगले उकळायचे. उकळत आले की या पाण्याचा रंग बदलतो.
४. मग हे उकळलेले पाणी एका कपात गाळून घ्यायचे आणि त्यामध्ये मीठ आणि खडीसाखर घालायची.
५. हे मिश्रण चांगले एकजीव करायचे आणि चहा सारखे प्यायचे. त्यामुळे असिडीटी पासून त्वरित आराम मिळण्यास मदत होते