राज्यात सगळीकडेच थंडी वाढली आणि संसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे चित्र गेल्या काही दिवसांत दिसत आहे. घरोघरी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांमध्येच सध्या ताप, सर्दी, खोकला यांची साथ आहे. इतकेच नाही तर अनेकांना यामध्ये उलट्या आणि जुलाबही होत आहेत. ताप, सर्दी झाले की अनेकदा आपल्याला काहीच सुधरत नाही. तापाने किंवा घसादुखी आणि खोकल्याने आलेला थकवा यांमध्ये सतत पडून राहावे लागते. अशात अन्न तर जात नाहीच पण पूर्ण गळून गेल्यासारखे होते (1 Easy Home Remedy for cough and cold).
सुरुवातीला साधा वाटणारा हा ताप लवकर कमी व्हायचे नाव घेत नाही. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करण्याशिवाय पर्याय नसतो. काही दिवसांनी तापातून बरे झाल्यावरही आलेला थकवा भरुन यायला बरेच दिवस जातात. हे सगळे आजारी असलेल्या व्यक्तीसाठी आणि तिच्या घरच्यांसाठीही ताणाचेच असते. औषधोपचार करण्याबरोबरच घरच्या घरी करता येतील असे काही सोपे आयुर्वेदीक उपाय माहित असल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री १ सोपा उपाय सांगतात. हा उपाय कोणता आणि तो कसा करायचा पाहूया...
१. तुळशीची ५ पाने घ्यायची, ५ काळ्या मिरीची पावडर आणि २.५ ग्रॅम सुंठ पावडर एकत्र करायचे.
२. साधारण ४ कप पाण्यात हे सगळे घालून १.५ कप होईपर्यंत चांगले उकळायचे.
३. मग यामध्ये गूळ घालून हे मिश्रण आणखी थोडे उकळायचे आणि १ ग्लास करायचे.
४. गॅस बंद केल्यानंतर हे मिश्रण गाळणीने ग्लासमध्ये गाळायचे आणि प्यायचे.
५. हा कफ किंवा खोकला अॅलर्जीक असल्याने या उपायांनी तो जाण्यास चांगली मदत होते.
६. हा उपाय करायला सोपा असून सलग काही दिवस केल्यास त्याचा निश्चितच चांगला फायदा होतो.