राज्याच्या काही ठिकाणी ऐन जानेवारीत म्हणजेच थंडीत पाऊस पडल्याने साथीच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. थंडीत एकाएकी थंडी गायब होऊन पावसाळी आणि दमट हवा पडल्याने सर्दी-खोकल्याचे रुग्ण वाढल्याचे चित्र आहे. सर्दी झाली की वाफ घेऊन किंवा काही ना काही घरगुती उपायांनी ती काही दिवसांनी बरी होते. पण खोकला झाला असेल तर तो लवकर बरे व्हायचे नाव घेत नाही. सध्या डॉक्टरांकडेही कोरड्या खोकल्याच्या रुग्णांची संख्या जास्त आहे (2 Easy Ayurvedic Home Remedies for dry cough) .
हवेतील बदलाने आणि श्वसन विकारांशी निगडीत असलेला हा खोकला वेळीच बरा व्हावा यासाठी घरगुती उपायांचाही फारसा फायदा होताना दिसत नाही. काही वेळा हा खोकला इतका जास्त असतो की आपली नीट झोप तर होत नाहीच पण खोकून नंतर आपला घसा आणि छातीही काहीशी दुखायला लागते. अशाच कोरड्या खोकल्यावर नेमका कोणता उपाय केल्यास फायदा होऊ शकतो याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. मिहीर खत्री २ सोपे उपाय सांगतात. हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे पाहूया...
१. खोकला कमी होत नसेल आणि खोकून खोकून तुम्हाला वैगात आला असेल तर एक सोपा उपाय करायचा. साधारण ५ वेलचीची सालासहीत पूड करायची. यामध्ये अर्धा चमचा तूप आणि अर्धा चमचा खडीसाखर व्यवस्थित एकत्र करायचे. हे चाटण दिवसातून एकदा घ्यायचे. यामुळे खोकल्यावर आराम मिळण्यास नक्कीच मदत होते. हे पदार्थ घरात सहज उपलब्ध असल्याने हा उपाय करणे सोपे आहे.
२. सकाळी झोपेतून उठल्यावर १ चमचा एरंडेल तेल कोमट पाणी किंवा चहासोबत घ्यायचे. या तेलामध्ये आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असे गुणधर्म असतात. त्यामुळे हा उपायही कोरड्या खोकल्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरु शकतो. दोन्हीपैकी कोणताही एक उपाय केल्यास आराम मिळण्यास मदत होईल.