Join us   

सकाळी उठल्यावर पोट साफच होत नाही? रात्री जेवण झाल्यावर न चुकता करा फक्त २ गोष्टी, सुधारेल पचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2023 12:05 PM

2 Easy Home Remedy For digestion Problem : जेवल्यानंतर ५ ते १० मिनीटे या २ गोष्टी केल्यास आपली पचनक्रिया नक्कीच सुधारण्यास मदत होते.

खाल्लेलं अन्न नीट पचत नाही, सकाळी उठल्यावर पोट साफच होत नाही. सतत अॅसि़डीटी-गॅसेस अशा पचनाशी निगडीत समस्या उद्भवतात. असं तुम्हालाही होत असेल तर पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी तुम्हाला काही उपाय करणे गरजेचे असते. व्यायामाचा अभाव, जंक फूडचे सेवन आणि बैठी जीवनशैली यांमुळे पचनाशी निगडीत समस्या उद्भवतात. पण पोट नीट साफ झाले तरच आपल्याला फ्रेश वाटते आणि दिवस चांगला जातो. अन्यथा आपल्याला अस्वस्थ वाटत राहते. नैसर्गिकरित्या पोटातील अनावश्यक घाण बाहेर येणे म्हणजेच पोट साफ होणे आवश्यक असते. पण असे होत नसेल तर रात्री झोपताना काही सोपे उपाय करता येतात. प्रसिद्ध फिटनेसतज्ज्ञ अंशुका परवानी यासाठी काय करायचे ते सांगतात. नियमितपणे जेवल्यावर ५ ते १० मिनीटे या २ गोष्टी केल्यास आपली पचनक्रिया नक्कीच सुधारण्यास मदत होते (2 Easy Home Remedy For Digestion Problem). 

(Image : Google)

१. वज्रासन

जेवण झाल्यावर वज्रासनात बसणे हा पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी सर्वात सोपा उपाय आहे. पाय गुडघ्यात दुमडून पायांवर बसणे म्हणजे वज्रासन. दिसायला हे आसन सोपे दिसत असले तरी ३ ते ५ मिनीटे या आसनात बसणे काहींसाठी अवघड असू शकते, मात्र सरावाने ते जमते. खाल्लेल्या अन्नाचे पचन होणे, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी यांसारख्या समस्या दूर होतात. तसेच पेल्विक स्नायू मजबूत करण्यासाठीही हे आसन उपयुक्त असते. 

२. पुषण मुद्रा 

जेवण जास्त झाले असेल आणि पोट जड झाले असेल तर वज्रासनातच बसून केले जाणारी ही पुषण मुद्रा अवश्य करायला हवी. यासाठी उजव्या हाताची पहिली २ बोटं अंगठ्याला जोडावीत आणि डाव्या हाताची मधली २ बोटं अंगठ्याला जोडावीत. आणि हात गुडघ्यावर ठेवून श्वासावर लक्ष केंद्रित करावे. सुरुवातीला ३ ते ५ मिनीटे करुन हळूहळू याची वेळ वाढवत न्यावी. एकदा जमायला लागल्यावर तुम्ही १५ मिनीटांपर्यंत ही मुद्रा करु शकता. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्स