Join us   

21 भाज्या, 21 पत्री ,  21 दुर्वा गणपतीला हे एवढं प्रिय का? कारण यात दडलंय निरोगी आरोग्याचं 'रहस्य'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2021 2:01 PM

गणपतीला 21 पत्री वाहाणे, 21 भाज्या आणि उकडीचे मोदक यांचा नैवैद्य दाखवणे याला आयुर्वेदाच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे. गणपतीला प्रिय असणार्‍या या प्रत्येक गोष्टीत आरोग्यासाठी महत्त्वाचे गुणधर्म आहेत.

ठळक मुद्दे 21 भाज्यांमधून शरीराला आवश्यक असणारे बारीक सारिक खनिजं, सर्व प्रकरची जीवनसत्त्वं, क्षार या भाज्यांमधून शरीराला मिळतात.21 वनस्पतीतील ज्या ज्या वनस्पती आपल्याला शक्य आहे तेवढ्या लावाव्या, जोपासाव्या आणि त्यांचा उपयोग करावा. किमान तुळस, आघाडा, दुर्वा, बेल, मधुमालती, डाळिंब हे दारात असायलाच हव्यात.आहारात खोबर्‍याचा वापर वाढणं हे पुढे येणारा ऑक्टोबर हिट आणि तेव्हा होणारा पित्ताचा त्रास यादृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. त्यासाठी हे उकडीचे मोदक

- वैद्य राजश्री कुलकर्णी

 श्री गणेशाची स्थापना झाल्यावर त्याचं पूजन करताना 21 वनस्पती वाहिल्या जातात आणि नैवेद्य म्हणून 21 भाज्या केल्या जातात. उकडीचा मोदक तर गणपतीला अतिशय प्रिय हे सर्व पोथ्या पुराणात सांगितलं आहे म्हणून करायचं नसतं. तर त्याला शास्त्रीय दृष्टया खूप महत्त्व आहे. गणपतीला 21 पत्री वाहाणे, 21 भाज्या आणि उकडीचे मोदक यांचा नैवैद्य दाखवणे याला आयुर्वेदाच्या दृष्टीनेही खूप महत्त्व आहे.

 छायाचित्र- गुगल

21 भाज्या का खाव्यात?

21 भाज्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या असतात. कारण यात श्रावण भाद्रपदात उगवलेल्या रानभाज्या खूप असतात. आपल्या परसात सहज उगवतील अशा भाज्या असतात. एरवी वर्षभर खात नाही त्या भाज्या यावेळी मिळतात. शहरात कमीच मिळतात. पण ग्रामीण भागात यांची विपुलता असते. रानभाज्या पावसाळ्यात आपोआप उगवलेल्या असतात. या भाज्यांचे तुरट आणि कडू रस पोटात जाणं महत्त्वाचं असतं. या भाज्या पूर्णता नैसर्गिक असतात. त्यांना खत किटकनाशकांची गरज नसते. या भाज्या याकाळात खाल्ल्या तर आपलं आरोग्य चांगलं राहातं. 21 भाज्यांमधे सर्व प्रकारच्या आणि गुणधर्मांच्या भाज्यांचा समावेश होतो. या भाज्यांमधे वेलवर्गीय लाल भोपळा, दुधी भोपळा, काकडी, दोडकी, गिलके, झाडांना येतात आणि फळभाज्या म्हणून ओळखल्या जातात अशा वांगी, भेंडी शेंगभाज्या गवार, घेवडा, वालाच्या शेंगा , जमिनीखाली वाढणार्‍या बीट, सुरण, मुळा, गाजर, अरबी , मेथी सारख्या पालेभाज्या या भाज्यांना 21 भाज्यात महत्त्वाचं स्थान आहे. या सर्व प्रकारच्या भाज्या 21 भाज्यांच्या निमित्ताने एकत्रित पोटात जातात. यातल्या प्रत्येक भाजीचा गुणधर्म वेगळा आणि विशेष असतो कारण ती वेगवेगळ्या ठिकाणी उगवलेली असते. जमिनीखालच्या भाज्यांमधे क्षार जास्त असतात. या भाज्यांचं आहारातलं महत्त्व कळण्यासाठी म्हणून हा 21 भाज्यांचा नैवेद्य असतो. खरंतर हे एका दिवसापुरती मर्यादित न राहाता अशा भाज्या खाण्याची सवय लागणं आवश्यक आहे. वरचेवर अशा वेगेवेगळ्या भाज्या आहारात असतील शरीरात पोषक घटकांचे कमतरता निर्माण होत नाही. शरीराला आवश्यक असणारे बारीक सारिक खनिजं, सर्व प्रकरची जीवनसत्त्वं, क्षार या भाज्यांमधून शरीराला मिळतात. या 21 भाज्या करताना आरोग्यदायी पध्दतीने करणं अपेक्षित आहे. कमीत कमी मसाले वापरले जायला हवेत. कांदा-लसूण नको. आलं मिरची, कढीपत्ता तिखट, हळद, हिंग जिरे, मोहरी, मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर वापरायला हवं.

 छायाचित्र- गुगल

पत्रीपुजनातल्या 21 वनस्पती

गणपतीच्या पुजेत पत्रीपूजनाला महत्त्व आहे. फुलं तर वाहातोच ना मग पत्री कशाला? 21 वनस्पती म्हणजे निवडक वनस्पतींची पानं आहेत. या वनस्पती रोजच्या वापरासाठी उपयोगी पडू शकतात अशा आहेत. या पत्री गणपतीला वाहताना त्या केवळ वाहून चालत नाही तर त्यांना ओळ्खणं, त्यांचे गुण जाणून घेणं आणि आपल्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या या वनस्पती जास्तीत जास्त प्रकारे आपल्या परसबागेत, अंगणात, गॅलरीतील कुंड्यात कशा लावता येतील याचा विचार होणं, तशी कृती होणं अपेक्षित आहे. या वनस्पती हाताशी असल्या की छोट्य छोट्या आरोग्यविषयक तक्रारी घरच्याघरी दूर होतात.

 

 छायाचित्र- गुगल

प्रत्येक वनस्पतीचं वैशिष्ट्य सांगायचं झाल्यास..

1 . पिंपळ- हवा शुध्दीकरणासाठी या झाडाला खूप महत्व. पिंपळाची लाख अर्थात राख खडीसाखरेबरोबर खाल्ल्यास चांगली झोप लागते. झोपेचे विकार दूर होतात. 2. जाई- तोंड आल्यावर जाईची पानं चाऊन खावीत, तोंडात निर्माण झालेली लाळ थुंकवी, या उपायाने तोंड लवकर बरं होतं. 3. अर्जुन- हाडे जोडणारी वनस्पती म्हणून आदिवासी भागात ही वनस्पती ओळखली जाते. हदयरोगावर ही वनस्पती उपयोगी ठरते. या वनस्पतीत कॅल्शियमचं प्रमाण खूप असतं. 4. रुई- हत्तीरोगावर रुईचं पान उत्तम औषध आहे. तसेच कृष्ठरोगावर देखील त्याचं औषध प्रभावी ठरतं. 5. मारवा- ही वनस्पती सुवासिक असून विविध प्रकारच्या जखमा भरणं किंवा कोणत्याही कारणामुळे त्वचेवर आलेले डाग घालवण्यासाठी उपयुक्त असते. 6. कण्हेरीची पानं- कण्हेरीची पानं, मुळं औषधी आहेत. वात विकारावरील महाविषारी तेलात हिचा वापर केला जातो. 7. देवदार- कफ, पडसे, संधिवात यासाठी देवदार पानांचा रस फायदेशीर ठरतो. 8. डोरली- याला काटे रिंगणी म्हणून ओळखतात. त्वचा रोग, पोटाचे विकार, मूत्ररोगांवर हे झुडूप फायदेशीर ठरतं. 9. डाळिंब्- डाळिंबाच्या पानांचा उपयोग जंतावर गुणकारी आहे. काविळीसाठीही त्याचा उपयोग केला जातो. 10 आघाडा- ऋषीपंचमीच्या दिवशी महिला दात घासण्यासाठी त्याचा वापर करतात. आघाडा मुखरोग आणि दंतरोगावर उत्तम औषध आहे. 11. विष्णुकांता- याला शंखपुष्पी म्हणतात. बुध्दीवर्धक म्हणून ही वनस्पती ओळखली जाते. ब्रेनटॉनिक म्हणून अत्यंत उपयोगी आहे. या वनस्पतीचा उपयोग मानसिक विकारांवर औषध म्हणून केला जातो. 12. शमी- शमीला सुप्त अग्नी देवता असं म्हणतात. त्वचारोग, दमा, मूत्रपिंड या आजारांवर शमी प्रभावी आहे. 13. दुर्वा- पांढर्‍या दुर्वा अर्थात हरळ गणपतीला प्रिय. नाकातून रक्त येणं, ताप , अंगातील दाह कमी करण्यासाठी दुर्वांचा रस अमृतासमान असतो. 14. तुळस- ही वनस्पती 24 तास ऑक्सिजन देणारी आहे. डासांना ती पळवून लावते. कफ, दमा, सर्दी, किटक दंश तसेच कर्करोग यासारख्या आजारांवर तुळशीचा रस उपयोगी ठरतो. 15. धोतरा- या वनस्पतीपासून अफ्रोपिन नावाचं औषध काढतात. वेदनानाशक म्हणून त्याचा उपयोग होतो. धोतर्‍याचे फूल दमा, कफ, संधिवत आदी रोगांवर उपयुक्त ठरतं. 16. बेलपत्रं- या वनस्पतीचा उपयोग पोटातील जंतावर गुणकारी आहे. अतिसार, आव, धडधड्, उष्णता आदींसाठी हिचा उपयोग होतो. 17. माका- पावसाळ्यात आढळणारी डोंगरी वनस्पती. माका हे रसायन आहे. म्हणजे कोणत्याही प्रकारचा रोग न होऊ देण्याची ताकद या वनस्पतीत आहे. मूत्रपिंडाचा आजार, कावीळ, त्वचारोग, विंचू दंश आदी रोगांवर माक्याचे औषध प्रभावी ठरते. 18. मधुमालती- फुप्फुसाचे विकार, त्वचारोग, सांधेदुखी, पोटातील कृमी कमी करण्यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. 19 बोर- बोराच्या बियांचं चूर्ण चेहेर्‍यावर लावल्यास पुटकुळ्या जातात. डोळे जळजळणे, तापामधील दाह यासाठी बोर उपयुक्त आहे. 20. हादगा- याला अगस्ती म्हणून ओळखलं जातं. हादग्यांच्या फुलांची भजी छान लागतात. ही फुलं म्हणजे जीवनसत्त्वांचा खजिना आहे. 21 केवडा- ही वनस्पती थायरॉइडच्या दोषावर गुणकारी आहे. अशा या गुणी  21 वनस्पती. या वनस्पती यासाठी देखील महत्त्वाच्या असतात कारण की पुढे सप्टेंबर संपून आक्टोबर लागतो. पाऊस कमी होतो. ऑक्टोबर हिट सुरु होते आणि पित्ताचे त्रास उफाळून येतात. डोकं दुखणं, डोळे जळजळणं, अँसिडिटी होणं, मळमळणं, उलटी होणं असे त्रास सुरु होतात. 21 वनस्पतीतल्या कितीतरी वनस्पती खास या आजारावर उपचारासाठी उपयोगी पडतात. म्हणून आयुर्वेद म्हणत या 21 वनस्पतीतील ज्या ज्या वनस्पती आपल्याला शक्य आहे तेवढ्या लावाव्या, जोपासाव्या आणि त्यांचा उपयोग करावा. किमान तुळस, आघाडा, दुर्वा, बेल, मधुमालती, डाळिंब हे दारात असायलाच हव्यात.

 छायाचित्र- गुगल

सहज पचणारा उकडीचा मोदक

 आहारात खोबर्‍याचा वापर वाढणं हे पुढे येणारा ऑक्टोबर हिट आणि तेव्हा होणारा पित्ताचा त्रास यादृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. या पित्तावर ओलं खोबरं खूप चांगला उपाय आहे. खोबरं हे शरीराची ताकद वाढवतो. साखर ही रसायनयुक्त असते त्यामुळे उकडीच्या मोदकात कमी रसायनं वापरलेली गूळ, सेंद्रिय गूळ वापरतो. उकडीचे मोदक हे महत्त्वाचे कारण पावसाळ्यात हवेचा परिणाम म्हणून पचनशक्ती मंदावलेली असते. तेव्हा तळलेले पदार्थ न खाता असे उकडलेले पदार्थ खाणं महत्त्वाचं, यासाठी हे उकडीचे मोदक. तसेच या उकडीच्या मोदकातला एक मुख्य घटक म्हणजे तांदूळ. तांदूळ हा आफ्ल्या रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक. तांदूळ, तांदळाचे पदार्थ पचायला हलके आणि ताकद देणारे असतात. उकडीचे मोदक तसे पचायला हलकेच. पण ओलं खोबरं हे गुळाच्या वापरामुळे थोडं पचायला जड जातं म्हणून उकडीचा मोदक फोडून त्यावर भरपूर साजूक तूप टाकून खायला हवा. यामुळे पोटातला अग्नी प्रदिप्त होतो आणि उकडीचा मोदक सहज पचतो.

( लेखिका नाशिकस्थित प्रसिध्द आयुर्वेद तज्ज्ञ आहेत. ) rajashree.abhay@gmail.com