बरेच जण सकाळी उठल्यावर कोमट पाणी आणि मध किंवा कोमट पाणी आणि लिंबू घेतात. तर बऱ्याच जणांना झोपेतून उठल्यावर चहा किंवा कॉफी घेण्याची सवय असते. पण रात्रभर साधारण ८ ते १० तास पोट रिकामे असेल तर सकाळी उठल्यावर पाणी पिणे ठिक आहे. त्यानंतर पोट साफ झाल्यानंतर दिवसाची सुरुवात करताना रिकाम्या पोटी फळे खाणे हा सर्वात उत्तम पर्याय होऊ शकतो. दिवसातील पहिला आहार उत्तम असेल तर दिवसभर तुमची ताकद टिकून राहण्यास मदत होते. काही पदार्थ रिकाम्या पोटी खाल्ले तर पोटात गडबड होण्याची शक्यता असते. अशावेळी आतडे किंवा पचनाच्या समस्या निर्माण होतात. तर, काही खाद्यपदार्थ आहेत पोट शांत करण्यास आणि शरीराचे कार्य सुधारण्यास फायदेशीर असतात. अशा गोष्टी कोणत्या याविषयी फिटनेस कोच अभिनव महाजन काही महत्त्वाच्या टिप्स देतात, त्या कोणत्या पाहूया (3 Best foods to eat on empty stomach)...
१. भिजवलेले बदाम
बदामामध्ये चांगले फॅट्स, व्हिटॅमिन इ, फायबर आणि प्रोटीन हे घटक असतात. त्यामुळे रिकाम्या पोटी बदाम खाणे मेंदूसाठी आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहण्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. बदामामध्ये असलेले फायटीक असिड खाल्लेल्या अन्नातील पोषक घटक शरीरामध्ये शोषून घेण्यास मदत करतात. त्यामुळे सकाळी भिजवलेले आणि साल काढलेले बदाम आवर्जून खायला हवेत.
२. पपई
सकाळी उठल्यावर एक बाऊल पपई खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होते. यामध्ये असलेले पापेन हा घटक खाल्लेले अन्न पचण्यास मदत करते तसेच बद्धकोष्ठता दूर करण्यास उपयुक्त ठरते. यामध्ये असलेले व्हिटॅमिन इ , सी आणि फायबरमुळे प्रतिकारशक्ती चांगली राहण्यास मदत होते. वजन नियंत्रणात राहण्यासाठीही पपई उपयुक्त असते.
३. मोड आलेली कडधान्ये
हिरवे मूग, छोले आणि काळा हरभरा यांसारख्या कडधान्यामध्ये व्हिटॅमिन सी, प्रोटीन चांगले असते. मोड आणल्याने हे पदार्थ अन्नातील पोषक घटक शरीरात शोषले जाण्यास मदत होते. त्यामुळे सकाळी उठल्यावर किमान ४० ग्रॅम मोड आलेली कडधान्ये खायला हवीत.