Join us   

सतत नाइटशिफ्ट केल्यानं ॲसिडिटी-कॉन्स्टिपेशनचा त्रास? ३ टिप्स- नाईट ड्युटी करुनही तब्येत ठणठणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2023 6:22 PM

3 Diet Tips For Night Shifts : नाइट शिफ्ट करणं साेपं काम नाही, शरीराचं घड्याळ बिघडतं आणि पचनाचे त्रास वाढतात.

करिअरमध्ये असणारी स्पर्धा, कामाचा ताण, स्वत:ला सिद्ध करण्यासाठी सुरू असणारी ओढाताण यांमध्ये आपले अनेकदा आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते. कामात आपण इतके जास्त गुंतून जातो की आपल्याला पाणी पिण्याचे किंवा खाण्याचेही भान राहत नाही. हल्ली अनेक कंपन्या या परदेशातील असल्याने आपल्याला त्या कंपन्यांच्या वेळानुसार काम करावे त्यामुळे मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या अनेकांचे काम हे आपल्या दुपारनंतर सुरू होते आणि रात्री उशीरा संपते. अनेकांना तर नाईट शिफ्टच करावी लागते. अशावेळी झोपण्याच्या, खाण्यापिण्याच्या सगळ्या वेळा बदलतात आणि मग त्याचा नकळत शरीरावर परिणाम होतो. त्यात चहा, कॉफी यांची सवय असेल तर आरोग्याची आणखीनच हेळसांड होते. हॉस्पिटलमधील स्टाफ, हॉटेल व्यवसायात काम करणारी मंडळी यांनाही रात्री उशीरापर्यंत काम करावे लागते. मात्र असे होऊ न देता तुम्ही नाईट शिफ्ट करणार असाल तर आहाराबाबत काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात (3 Diet Tips For Night Shifts). 

१. घर सोडताना काय खाल? 

नाईट शिफ्टमुळे आपली पचनक्रिया, मानसिक आरोग्य या गोष्टी बिघडतात. त्या नीट ठेवण्यासाठी आहाराकडे योग्य पद्धतीने लक्ष देण्याची आवश्यकता असते. त्यासाठी रात्रीच्या वेळी ऑफीसला जाताना शक्यतो आहारात तृणधान्यांचा समावेश करायला हवा. यामध्ये तुम्ही राजगिरा, नाचणी किंवा ज्वारीची भाकरी, उपमा असं काही ना काही खाऊ शकता. यामुळे रात्रीच्या वेळी कोला, चॉकलेट, चिप्स यांसारख्या गोष्टी खाण्याचे क्रेविंग्ज होणार नाहीत.

२. ऑफीसला पोहोचल्यावर चहा-कॉफीला पर्याय काय? 

ऑफीसला पोहोचल्यावर आपल्याला झोप येऊ नये किंवा जाग राहावी यासाठी अनेक जणांना चहा किंवा कॉफी घ्यायची सवय असते. उन्हाळ्याच्या दिवसांत कोल्ड कॉफी किंवा मिल्क शेकही घेतला जातो. मात्र त्यापेक्षा पाणी, ताक किंवा सिझनल सरबत घ्यायला हवे. यामुळे शिफ्ट संपत येताना तुम्हाला अॅसिडीटी, ब्लोटींग, मळमळ असे पचनाशी निगडीत त्रास होणार नाहीत.

३. सकाळी झोपताना काय खाल? 

नाईट शिफ्टची लोकं पहाटे किंवा सकाळी घरी येतात. त्यावेळी त्यांना झोप येत नाही किंवा आणखी काही त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी घरातील मंडळी चहा घेत असतील किंवा नाश्ता करत असतील तर नकळत तसेच केले जाते. पण आपण रात्रभर जागे असल्याने आपल्यासाठी ते योग्य नसते. त्यामुळे नाईट शिफ्टला काम केलेल्यांनी सकाळी घरी आल्यावर शक्यतो एक केळं, आताच्या सिझनमध्ये आंबा किंवा दूध आणि गुलकंद घ्यायला हवे. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल