झोप ही आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठीची एक महत्त्वाची गोष्ट असते. रात्रीची पुरेशी आणि शांत झोप झाली तर आपले आरोग्य आणि एकूणच व्यवहारही चांगला होण्यास मदत होते. उत्तम आरोग्यासाठी आहार, व्यायाम, मानसिक स्वास्थ्य हे जसं गरजेचं असतं तसंच रात्रीची ७ ते ८ तासांची गाढ झोप होणंही तितकंच गरजेचं असतं. रात्रीची झोप नीट झाली नाही तर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. झोप न झाल्याने अॅसिडीटी, डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात (3 easy remedies for good night sleep).
ज्यांना पडल्या पडल्या गाढ झोप लागते किंवा घोरायला लागतात ते खऱ्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जातं. पण सगळेच या बाबतीत नशीबवान असतात असं नाही. कारण अनेकांना कितीही प्रयत्न केले तरी अजिबात झोप येत नाही. असं होण्यामागे बरीच कारणं असतात, यामध्ये आरोग्याच्या तक्रारी, मानसिक ताण, स्क्रीनचा अतिवापर, कामाचा ताण, कौटुंबिक जबाबदाऱ्या, विचारांचे काहूर अशा बऱ्याच गोष्टींचा समावेश असतो. आता रात्रीची शांत झोप येण्यासाठी काय करावं याबाबत आपल्याला काही सामान्य गोष्टी माहित असतात. पण डॉ. स्मिता भोईर-पाटील त्याशिवाय काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया...
१. सूर्यप्रकाश
सकाळी उठल्यावर १० मिनीटे न चुकता सूर्यप्रकाशात उभे राहा. सूर्यप्रकाशातून आपल्याला व्हिटॅमिन डी मिळते. हे आपल्यापैकी अनेकांना माहित असते. पण त्याशिवायही सूर्यकिरणांमुळे शरीराची झोपण्याची आणि उठण्याची वेळ नियमित होते. यालाच आपण बॉडी क्लॉक असे म्हणतो. त्यामुळे नैसर्गिक सूर्यप्रकाश आपल्या झोपण्याच्या वेळेवर महत्त्वाचा
२. मेडीटेशन
झोपण्याआधी १० ते १५ मिनीटे न विसरता मेडीटेशन करा. साधारणपणे आपण झोपतो तेव्हा शांत असतो. त्यामुळे आपल्या मनात खूप विचार यायला सुरुवात होते. पण हे विचारचक्र शांत थांबवायचे असेल आणि मन शांत करायचे असेल तर मेडीटेशन करणे हा उत्तम उपाय असतो. यामुळे दिवसभराचा शारीरिक, मानसिक थकवाही कमी होण्यास मदत होते.
३. अश्वगंधा
अश्वगंधा ही एक अतिशय उपयुक्त अशी वनस्पती असून आयुर्वेदात तिचे खूप फायदे सांगितले आहेत. अश्वगंधा पावडर किंवा सप्लिमेंट ताण किंवा भिती कमी होण्यासाठी उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्हाला शांत झोप लागत नसेल तर हा एक अतिशय उत्तम असा पर्याय आहे.