Join us   

पावसाळ्यात आहारात रोज हवेतच ३ पदार्थ, साथीच्या आजारांचा धोका टाळण्याचा सोपा उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2023 1:43 PM

3 Foods to Increase Immunity In Monsoon : प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा

पावसाळ्याच्या दिवसांत बाहेर गारवा आणि हिरवाई असल्याने मनाने आपल्याला छान वाटते खरे. पण याच दिवसांत संसर्गजन्य आजार, पाण्यातून किंवा अन्नातून होणाऱ्या पोटाच्या समस्या यांचे प्रमाण वाढते. लहान मुले, ज्येष्ठ मंडळी किंवा ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे अशांना तर या काळात हमखास त्रास होतो. सततच्या दमट हवामानामुळे हवेत जंतूंचे प्रमाण वाढते. पचनशक्ती क्षीण झाल्याने अन्न म्हणावे तसे पचत नाही. त्यामुळे गॅसेस, बद्धकोष्ठता, अॅसिडीटी असे त्रास उद्भवू शकतात (3 Foods to Increase Immunity In Monsoon). 

तसेच या काळात गारठ्यामुळे सर्दी-ताप, खोकला यांसारखे संसर्गजन्य आजारही वाढतात. या आजारांपासून दूर राहण्यासाठी कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी याविषयी समजून घेणे गरजेचे असते. उन्हाळ्यात सतत पाणी पाणी होत असल्याने आपण गार आणि द्रव पदार्थ जास्त घेतो. थंडीच्या दिवसांत पौष्टीक आणि शरीराला ताकद देणारे गरमागरम पदार्थ जास्त प्रमाणात खाल्ले जातात. त्याचप्रमाणे पावसाळ्यात पचायला हलके, ताकद देणारे आणि ताजे अन्न पदार्थ खायला हवेत. तसेच प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा त्या कोणत्या पाहूया... 

१. आलं 

सर्दी, खोकला किंवा फुफ्फुसासंदर्भातील विकार टाळण्यासाठी पावसाळ्यात रोज सकाळी आलं आणि मधाचे चाटण घ्यावे. थंड वातावरणात चहा पिण्याची तल्लफ झाल्याशिवाय रहात नाही. त्यामुळे पावसाळ्यात जेव्हा- केव्हा चहा प्याल, तेव्हा त्यात न विसरता आलं घाला. आलं उष्ण थंडीच्या दिवसांत शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी त्याची मदत होते. तसेच प्रतिकारशक्ती टिकून राहण्यासाठी या काळात आहारात आलं घेणं अतिशय उपयुक्त ठरतं. 

(Image : Google)

२. प्रोबायोटीक 

पचनक्रिया सुरळीत राहण्यासाठी पावसाळ्यात आवर्जून काही पदार्थांचा आहारात समावेश करायला हवा असं आपण वारंवार ऐकतो. दही हे यातीलच एक. गारठ्यामुळे आपल्याला दही खाण्याची इच्छा नसेल तर ताक, लस्सी, लोणची यांसारख्या प्रोबायोटीक गोष्टींचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. यामुळे पचन सुरळीत होऊन पोटाला थंडावा मिळण्यास मदत होईल. तसेच ताक, लस्सी घेतल्याने शरीराला हायड्रेशन मिळण्यासही मदत होईल. 

३. सी व्हिटॅमिन्स देणारी फळे

प्रतिकारशक्ती कमी होणे, संसर्जन्य आजार यांमुळे या काळात आपल्याला सर्दी, ताप, खोकला अशा समस्या उद्भवतात. हे होऊ नये किंवा झाले असल्यास लवकर बरे व्हावे यासाठी सी व्हिटॅमिनचा आहारात जास्तीत जास्त समावेश करावा. या फळांमध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस विविध प्रकारचे व्हायरस आणि बॅक्टेरीयाशी लढण्याचे काम करतात. यात संत्री, मोसंबी, लिंबू, किवी, टोमॅटो यांसारख्या आंबट फळांचा समावेश होतो. 

(Image : Google)

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलमोसमी पाऊसपावसाळा आणि पावसाळी आजारपण