Join us   

नवरात्रात खायलाच हवेत ३ पदार्थ, तज्ज्ञ सांगतात, सणावाराचा आनंद घेताना आहाराचा समतोल राखायचा तर.…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2023 3:00 PM

3 Foods you must have during Navratri by Rujuta Divekar : उपवासाचा त्रास होऊ नये आणि अंगातील ताकद टिकून राहावी यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.

नवरात्र हा देशभरात साजरा केला जाणारा मोठा सण. गणेशोत्सवानंतर नवरात्रीची धामधूम सुरु होते. देवीची भक्तीभावाने केली जाणारी पूजा, घरोघरी बसणारे घट, भोंडला, गरबा, नऊ दिवसांचे उपवास हे सगळे करताना आपल्या अंगात उत्साह आणि आनंद टिकून राहणेही तितकेच महत्त्वाचे असते. यासाठी आपल्या शरीराचे आहारातून योग्य पद्धतीने पोषण होणे आवश्यक असते. उपवास हा मनावर आणि जिभेवर ताबा मिळवण्यासाठी असला तरी शरीराला त्याचा त्रास होता कामा नये. यासाठीच उपवास करताना कोणते पदार्थ खावेत, काय टाळावे, काय काळजी घ्यावी हे आपण वारंवार वाचत, ऐकत असतो (3 Foods you must have during Navratri by Rujuta Divekar). 

मात्र तरीही या काळात वातूळ, तेलकट खाणे होतेच. महिलांची या काळात जास्त दमणूक होण्याची शक्यता असते. कारण पूजाअर्चा, उपवास आणि नेहमीचा स्वयंपाक, हळदीकुंकू किंवा भजन, भोंडला कार्यक्रम आणि नेहमीचे ऑफीस. याचा आरोग्याला त्रास होऊ नये आणि अंगातील ताकद टिकून राहावी यासाठी आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवे.  प्रसिद्ध सेलिब्रिटी आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्या आहार आणि फिटनेस विषयातील उपयुक्त माहिती देऊन जागरुकतेचे काम करत असतात. आता नवरात्रीबाबत त्या काय सांगतात पाहूया...

१. शिंगाडा 

उपवास म्हटल्यावर साधारणपणे साबुदाणा, वरई, राजगिरा या गोष्टी प्रामुख्याने खाल्ल्या जातात. पण त्याशिवाय चालणारा शिंगाडा हा जिन्नस आवर्जून खायला हवा. शहरी भागात जास्त खाल्ल्या न जाणाऱ्या शिंगाड्याचे आरोग्याला बरेच फायदे होतात. त्वचा चांगली राहण्यासाठी हे पीठ अतिशय फायदेशीर असते, याची भाकरी, डोसा करता येतो. 

२. कुट्टू 

हे जम्मू-काश्मिर, हिमालय या भागात पिकणारे एक धान्य असून त्यात मोठ्या प्रमाणात प्रोटीन, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम, फोलेट, झिंक, कॉपर असे घटक असतात. आरोग्याला यातून चांगले पोषण मिळत असल्याने नवरात्रीच्या दिवसांत या पीठाचे पदार्थ आवर्जून खायला हवेत. यापासून पराठे, धिरडी, वडे, असे काहीही करता येऊ शकते. मेंदूच्या आरोग्यासाठी आणि ज्या महिलांना मासिक पाळीच्या आधी काही त्रास होतो अशांसाठी हे फायदेशीर असते. 

३. हरभरा 

सुंदल किंवा चना पुडी हे पदार्थ महाराष्ट्रात नाही पण भारताच्या दक्षिण भागांत नवरात्रीच्या दिवसांत आवर्जून बनवले जातात. डाळ किंवा कडधान्य या विभागात मोडणारा हा काळा चणा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतो. प्रोटीन आणि फायबरचे उत्तम स्त्रोत असल्याने ताकद मिळण्यास याची चांगली मदत होते.   

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव 2023नवरात्री उपवास आणि पदार्थ २०२३आहार योजनाआरोग्यनवरात्री