आपण कायम फिट आणि फाईन असावं असं प्रत्येकाला वाटतं. पण रोजच्या धावपळीत आपण इतके अडकून जातो की आपल्याला व्यायाम, आहाराकडे लक्ष देणे यांसाठी अजिबात वेळ होत नाही. मग आपले आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष होते आणि आरोग्याच्या तक्रारी वारंवार डोकं वर काढायला लागतात. अपुरी झोप, मानसिक स्वास्थ्य नसणे, कामाचा ताण या सगळ्याचा परीणाम आपल्या आरोग्यावर होतो. या सगळ्यामुळे अनेकदा आपल्याला सारखे थकल्यासारखे होते (3 Mistakes to Avoid on Your Fitness Journey).
अनेकदा सगळं व्यवस्थित असूनही आपल्याला सतत काहीच न करता पडून राहावेसे वाटते, फ्रेश वाटत नाही. याचे सगळ्यात महत्त्वाचे कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या पद्धती किंवा आहाराबाबत पुरेसे ज्ञान नसणे. यामुळे शरीराचे योग्य पद्धतीने पोषण न झाल्याने शरीरात विविध प्रकारच्या कमतरता राहतात आणि त्याचा परीणाम म्हणून आपण सतत थकलेले किंवा अशक्त राहतो. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ ऋजूता दिवेकर यासाठीच ३ महत्त्वाच्या चुका आपल्याशी शेअर करतात. या ३ चुका आपण दैनंदिन व्यवहारात टाळल्या तर आपण फिट राहण्यास निश्चितच मदत होऊ शकते. पाहूयात आवर्जून टाळायला हव्यात अशा ३ चुका...
१. कार्बोहायड्रेटसची भिती
आपलं वजन वाढतं त्यामुळे आपण आपला नियमित आहार घेणे बंद करतो आणि डाएट फूड किंवा वेगळे काहीतरी खातो. मग पोळी, भाजी, पराठा, डोसा, भात, आमटी, सलाड यामध्ये फायबर असल्याने आपण हे पदार्थ खाणे टाळतो. पण असे करणे आपल्या आरोग्यासाठी फायद्याचे नसते. शरीराला कार्बोहायड्रेटसची आवश्यकता असते, ती योग्य भरुन काढणे गरजेचे असल्याने आपला नियमित आहार योग्य त्या प्रमाणात योग्य वेळेला घेणे गरजेचे आहे.
२. बिंज इटींग डिसऑर्डर
अनेकदा महिला एकदा खाल्ल्यानंतर बराच वेळ काहीच खात नाहीत. यामुळे दोन खाण्यांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त गॅप पडतो. असा गॅप पडणे आरोग्याच्या दृष्टीने योग्य नसते. पण अनेकदा गॅप पडल्यानंतर एखादी व्यक्ती काही खाते ती भूक लागली म्हणून नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणात खाते. मात्र यामुळे आपल्या शरीराचे योग्य पद्धतीने पोषण होत नाही आणि तब्येतीवर त्याचा चुकीचा परिणाम होतो.
३. अकार्यक्षम व्यायाम
अनेकदा अमुक इतकं वजन कमी करायचं म्हणून आपण ठराविक व्यायाम करतो. विशिष्ट दिवसांत आपल्याला इतकं करायला हवं म्हणून आपण करतो. मात्र हा व्यायाम आपण मनापासून करत नाही. आरोग्य, मनस्थिती यांसाठी व्यायाम न करता केवळ मला अमुक एक टार्गेट पूर्ण करायचे या विचाराने जेव्हा व्यायाम केला जातो तेव्हा त्याचा म्हणावा इतका फरक जाणवत नाही. असे न करता मजा घेत आनंदाने व्यायाम केल्यास त्याचा फिट राहण्यासाठी नक्कीच चांगला उपयोग होतो.