भारतात सकाळी झोपेतून उठल्यावर लगेचच चहा किंवा कॉफी घेण्याची पद्धत बऱ्याच वर्षांपासून आहे. झोपेतून जागे होण्यासाठी आणि पोट साफ होण्यासाठी अनेकदा हा चहा घेतला जातो. एकदा सकाळी चहा घेण्याची सवय लागली की ती मोडणे अवघड असल्याने असंख्य लोक हे रुटीन फॉलो करत असतात. अशा लोकांना एखादवेळी सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी मिळाली नाही तर अतिशय अस्वस्थ होते आणि पोट साफ व्हायला त्रास होतो. तुम्हालाही असा त्रास होत असेल तर तुमचे पोटाचे आरोग्य चांगले नाही हे तुम्ही वेळीच लक्षात घ्यायला हवे. कारण पोट साफ होणे ही नैसर्गिक क्रिया असून ती अशाप्रकारे कोणत्याही सवयीशी निगडीत असता कामा नये असे आहारतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तुम्हालाही अशी अडचण येत असेल तर नेमकी काय अडचण आहे हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. यामागे कोणती ३ कारणे आहेत ते आहारतज्ज्ञ श्वेता पांचाळ-शहा सांगतात (3 reasons behind Pooping problem without tea or coffee in the morning).
१. पाण्याचे कमी प्रमाण
कमी पाणी प्यायल्याने अनेकदा शरीरात कोरडेपणा किंवा शुष्कपणा निर्माण होतो. त्यामुळे पाणी आणि द्रव पदार्थांचे आहारातील प्रमाण योग्य असायला हवे. थंडीच्या दिवसांत हवेत कोरडेपणा जास्त वाढतो तसेच तहान कमी लागते त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होण्याची शक्यता असते. पण असा त्रास होऊ नये म्हणून जास्तीत जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी केव्हाही जास्त चांगले.
२. आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त असणे
आहारात प्रोसेस्ड पदार्थ जास्त प्रमाणात असतील तरीही पोट साफ होण्यात अडचणी येतात. कारण प्रोसेस केलेल्या पदार्थांमध्ये मैदा आणि साखर जास्त असते. तसेच या पदार्थांमध्ये फायबरचे प्रमाण कमी असते. त्यामुळे पोट वेळच्या वेळी नीट साफ होत नाही. अशावेळी आहारात धान्ये, कडधान्ये, डाळी, बिया, फळं, भाज्या यांचा समावेश वाढवायला हवा. जेणेकरुन पोट साफ होण्यास मदत होईल.
३. शरीराची हालचाल न करणे
दिवसभर आपण सतत बैठे काम करत असलो आणि अजिबातच हालचाल होत नसेल तरीही कोठा जड होण्याची समस्या निर्माण होते. कामाच्या नादात आपण बरेचदा तासनतास जागेवरुन उठत नाही आणि हालचालही करत नाही. यामुळे खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे दर काही वेळाने शरीराची किमान हालचाल करायला हवी. इतकेच नाही तर सकाळी किंवा संध्याकाळी चालणे, योगासने असा किमान व्यायाम करायला हवा.