Join us   

आवडते म्हणून संक्रांतीला गुळपोळीवर ताव मारला? खाताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; होणार नाही त्रास...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 11:26 AM

3 rules while having tilgul poli makar sankranti : गूळ पोळी बाधू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी याविषयी...

मकर संक्रांत हा थंडीतील एक महत्त्वाचा सण. थंडी संपून उन्हाळा सुरू होण्याची चाहूल संक्रांतीनंतर लागते. प्रत्येक सणाला आपल्याकडे ठराविक गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे त्याचप्रमाणे संक्रांतीला गूळाची पोळी आवर्जून केली जाते. तीळ आणि गूळ यांचे सारण भरुन केली जाणारी ही पोळी आपण वर्षातून एकदाच खातो. अनेकांना तीळाची पोळी इतकी जास्त आवडते की या दिवशी गुळाच्या पोळीवर ताव मारला जातो. हे सारण आणि पोळीही टिकत असल्याने साधारपणे नंतरही आठवडाभर या तीळगूळाच्या पोळ्या आवडीने खाल्ल्या जातात. तीळ आणि गूळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ असल्याने थंडीच्या काळात शरीराला उष्णता देण्यासाठी म्हणून ही पोळी करण्याची रीत आहे. आरोग्यासाठी ही पोळी अतिशय पौष्टीक असली तरी ती खाण्याची योग्य पद्धत माहिती असायला हवी. अन्यथा ती बाधण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. पाहूयात गूळ पोळी बाधू नये म्हणून कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी (3 rules while having tilgul poli). 

१. योग्य प्रमाणातच खावी, नाहीतर..

अनेकदा गुळपोळी आवडते म्हणून त्यावर ताव मारला जातो. पण गूळ आणि तीळ हे दोन्हीही उष्ण पदार्थ असतात. सध्या म्हणावी तितकी थंडी पडलेली नाही. अचानक पाऊस, उकाडा यामुळे तितके थंड वातावरण नाही. अशा वातावरणात आवडते म्हणून प्रमाणापेक्षा खूप जास्त गूळ पोळी खाल्ली तर त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो. काही वेळा ही पोळी पचायला जड असल्याने पचनाशी निगडीत समस्याही उद्भवू शकतात. असे होऊ नये म्हणून एकावेळी योग्य प्रमाणात खाल्लेले केव्हाही चांगले. 

(Image : Google)

२. तूपाशिवाय पोळी खाऊ नये

गूळ आणि तीळ घातल्याने ही पोळी पचायला थोडी जड होते. त्यामुळे ती नुसती खाणे योग्य नाही. आपल्याकडे या पोळीवर भरपूर तूप घेऊन खाण्याची पद्धत आहे. त्यामागे पोळी बाधू नये आणि ती पचायला हलकी व्हावी हेच आहे. त्यामुळे गुळाची पोळी तूप घातल्याशिवाय अजिबात खाऊ नये. अनेक जण सध्या बाजारातून पोळीचे पॅकेट आणून तशीच पोळी खातात. पण तूप न घातल्यास ती पोळी नीट पचत नाही. 

३. गूळपोळीवर पाणी पिणे 

साधारणपणे गोड पदार्थावर आपण लगेच पाणी पित नाही. पण गोड खाल्ल्यानंतर किंवा तूप घातलेली पोळी खाल्ल्यानंतर काही काळाने आपल्याला पाणी पाणी होण्याची शक्यता असते. जेवणानंतर २ घोट पाणी पिणे ठिक आहे. पण गुळाच्या पोळीचे जेवण करुन त्यावर ढसाढसा पाणी प्यायले तर ते बाधण्याची शक्यता असते. त्यामुळे काही काळ गेल्यानंतर थोडे थोडे पाणी प्यावे. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समकर संक्रांतीआहार योजना