सध्या थंडीचा कहर खूपच जास्त वाढला आहे.. अनेक शहरांच्या तापमानाचा पारा एक अंकी संख्येवर येऊन ठेपला आहे. वातावरणात होणारा हा बदल सहन न झाल्यामुळे सध्या घराघरांत सर्दी- खोकल्याचे (cold and cough) रूग्ण आढळून येत आहेत. सर्दी ३ ते ४ दिवसांत बरी झाली तरी खोकला काही कमी होत नाही, अशी अनेक जणांची तक्रार आहे. खोकला थांबविण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य औषधोपचार तर घ्याच, पण त्यासोबतच घरच्याघरी हे काही साधे- सोपे उपाय देखील करून बघा. लवकर आराम मिळेल. शिवाय हे सगळे पदार्थ आपल्या नेहमीच्या खाण्यातलेच असल्याने त्याने तब्येतीस काही अपाय देखील नाही...
कोरडा खोकला थांबविण्यासाठी करून बघा हे ३ उपाय...
१. आलं ठरेल गुणकारी (use of ginger for dry cough)
आलं हे अतिशय औषधी आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांत आल्याचा आहारातला वापर वाढवायला हवा. कोरडा खोकला घालविण्यासाठी आल्याचा हा सोपा उपाय करून बघा. यासाठी आल्याचा एक बारीक तुकडा ठेचून घ्या. त्यामध्ये चुटकीभर मीठ टाका आणि हे मिश्रण दोन ते मिनिटांसाठी तोंडात ठेवा. ५ मिनिटांनंतर हा आल्याचा तुकडा चावून खावून घ्या, गिळून टाका किंवा मग बाहेर काढून टाका. आल्यामध्ये असणारे ॲण्टी मायक्रोबियल आणि ॲण्टी इंफ्लामेटरी गुण खोकला बरा होण्यासाठी मदत करतात. हिवाळ्यात रोज खजूर खाण्याचे ५ फायदे; ही 'डेट' चुकवू नका, २ पौष्टिक रेसिपी
२. ज्येष्ठमध आणि मध (honey)
घशातलं इन्फेक्शन दूर करण्यासाठी मध अतिशय उपयुक्त ठरतो. हा उपाय करण्यासाठी एक टी स्पून मध आणि चुटकीभर मीरेपूड एकत्र करा आणि ते चाटण रात्री घ्या. सलग ३ ते ४ दिवस हा उपाय करावा. याशिवाय ज्येष्ठमध आणि मध यांचा एकत्रित उपायही खोकला घालविण्यासाठी प्रभावी ठरतो. हा उपाय करण्यासाठी दोन टीस्पून मध घ्या. त्यात अर्धा ते एक टी स्पून ज्येष्ठमध पावडर टाका आणि हे मिश्रण चाटून घ्या. सकाळ- संध्याकाळ सलग ३ ते ४ दिवस हा उपाय केल्यास खोकला कमी होतो. हिवाळ्यात खायलाच हवेत असे १० पदार्थ; वर्षभर तब्येत ठणठणीत आणि त्वचा-केस सुंदर
३. लवंग (cloves)
खोकला आल्यावर नुसती लवंग खाण्यापेक्षा लवंग आणि मध हे मिश्रण एकत्र करा आणि त्याचं चाटण घ्या. हा उपाय करण्यासाठी लवंग चांगल्या भाजून घ्या. लवंग भाजण्यासाठी त्या थेट गॅसच्या बर्नरवर ठेवा आणि गॅस पेटवा. अवघ्या ५- ६ सेकंदात लवंग चांगल्या भाजल्या जातात. त्यानंतर या लवंगा हातानेच थोड्या जाड्याभरड्या चुरून घ्या. त्यात थोडा मध टाका आणि हे मिश्रण चावून खा.
तज्ज्ञ सांगतात....
सतत कोरडा खोकला व ढास लागत असल्यास आल्याचा रस १ भाग व ओल्या हळदीचा रस २ भाग मध टाकून सकाळ- संध्याकाळ २ वेळा घ्या. हा उपचार नियमितपणे ५ दिवस करावा. यामुळे कोरडा खोकला आणि ढास लागणे कमी होते...
- वैद्य संतोष नेवपूरकर, (पी. एचडी. आयुर्वेद)