Join us   

फळं खाताना कायम लक्षात ठेवा ३ नियम, डॉक्टर सांगतात, नाहीतर फळांतून पोषण मिळण्याऐवजी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2024 1:36 PM

3 Simple rules while having fruits diet tips : नियम न पाळता आपण फळं खाल्ली तर त्यातून शरीलाचे पोषण होण्याऐवजी शरीराला अपाय होण्याची शक्यता असते.

फळं हा जीवनसत्त्व, खनिजं आणि इतर अनेक घटकांचा उत्तम स्त्रोत असल्याने आपण आहारात फळांचा भरपूर प्रमाणात समावेश करतो. लहान मुलं, गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरीक किंवा आजारी व्यक्तींना अन्न जात नसेल तर आवर्जून फळं खाण्यास सांगितले जाते. त्यामुळेच आपण आहारात विविध चवीच्या, रंगांच्या फळांचा समावेश करतो. विशिष्ट सिझनमध्ये बाजारात येणारी आणि स्थानिक ठिकाणी पिकणारी किमान २ फळं आवर्जून खायला हवीत असं म्हटलं जातं (3 Simple rules while having fruits diet tips). 

फळं आरोग्यासाठी चांगली असली तरी ती खाण्याचे काही किमान नियम असतात. ते नियम न पाळता आपण फळं खाल्ली तर त्यातून शरीलाचे पोषण होण्याऐवजी शरीराला अपाय होण्याची शक्यता असते. म्हणूनच आहारात फळांचा समावेश करताना ती कोणत्या वेळेला, कशा पद्धतीने, किती प्रमाणात खायला हवीत याबाबतच्या काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जांगडा फळं खाण्याविषयीच्या काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन सांगतात, त्या कोणत्या ते पाहूया... 

१. फळ इतर कशासोबत न खाता नुसतं खायला हवं

फळ दूध, दही, चीज यांसारख्या डेअरी प्रॉडक्टसोबत खाल्ले तर ते टॉक्सिक होण्याची शक्यता असते. त्यामुळे ते पचायलाही जड होते आणि पोटासाठी चांगले नसते. तसेच फळं भाज्यां, धान्य यांसाच्यासोबतही खाऊ नयेत. यामुळे पचनक्रियेवर ताण येण्याची शक्यता असते. फळ १ तास पोटात, १ तास लहान आतड्यात आणि १ तास मोठ्या आतड्यात अशाप्रकारे ३ तास शरीरात पचनक्रिया करत असते. पण ते इतर कोणत्या गोष्टीसोबत खाल्ल्यास ते पचायला कित्येक तास लागतात आणि त्यामुळे गॅसेस, अपचन, ब्लोटींग अशा समस्या उद्भवतात. 

२. जेवण झाल्यावर लगेच फळ नको

अनेकांना नाश्ता किंवा जेवण झाल्यावर गोड खावेसे वाटले म्हणून किंवा जेवणानंतर फलाहार घ्यावा म्हणून फळं खाण्याची सवय असते. आपण खाल्लेले अन्न पचण्यासाठी पुरेसा कालावधी गरजेचा असतो. तो न मिळता त्यावर लगेचच फळ खाल्ले तर हे दोन्ही घटक पचायला जड होतात. 

३. सूर्यास्तानंतर फळ खाऊ नयेत

फळं ही सकाळी उठल्यावर , नाश्ता आणि दुपारच्या जेवणाच्या मधल्या वेळात किंवा ४ ते ५ वाजताच्या दरम्यान खायला हवीत. शक्यतो सूर्यास्तानंतर फळं खाऊ नयेत, कारण त्यात असणारे घटक संध्याकाळच्या वेळी पचायला अवघड असतात. तसेच आपल्या झोपण्याच्या वेळांवरही याचा परीणाम होत असल्याने फळं संध्याकाळच्या वेळी अजिबात खाऊ नयेत. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळे