एप्रिल महिना नुकताच सुरू झाला असून या काळात हवेत उष्णता वाढलेली असते. मात्र गेल्या काही दिवसांपासून उकाडा काही प्रमाणात वाढला असून पावसाळी अशी दमट हवा पडली आहे. अशा दमट हवेमुळे आपल्याला कफ होण्याची शक्यता असते. अशावेळी काही गोष्टींची आवर्जून काळजी घ्यायला हवी. या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात याविषयी आयुर्वेदतज्ज्ञ वरलक्ष्मी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. अशा विचित्र हवामानामुळे शरीर जड झाल्यासारखे होते आणि या काळात शरीरात एकप्रकारच्या चिकट पदार्थाची निर्मिती होते. म्हणूनच या काळात अनेकांना श्वसनाशी निगडीत आणि त्वचेच्या विविध प्रकारच्या अॅलर्जी होतात. अशावेळी आवर्जून टाळायला हव्यात अशा गोष्टी कोणत्या ते पाहूया (3 things to Avoid In Spring or Summer)...
भर उन्हाळ्यात पावसाळी हवेने घसा खवखवतो, दुखतो आहे, गिळायला त्रास होतो? १ सोपा उपाय, घसा होईल मोकळा
१. दिवसाची झोप
अनेकदा उन्हामुळे किंवा हवा ढगाळ असल्याने आपल्याला दुपारी झोपावेसे वाटते. पण या काळात शरीरातील कफ वाढलेला असतो. या कफामुळे आपला जठराग्नी किंवा पोटातील अग्नी वाढण्याची शक्यता असते. झोपेमुळे हा त्रास नेहमीपेक्षा जास्त वाढू शकतो. म्हणून अशा हवामानात दुपारी झोपणे आवर्जून टाळायला हवे.
२. आहारात जड आणि गार पदार्थांचा समावेश
आपण अनेकदा आहारात दही, चीज, साखरेचे पदार्थ, आईस्क्रीम, कंदमुळे, चॉकलेट, तळलेले पदार्थ यांचा समावेश करतो. हे पदार्थ चवीला चांगले लागत असल्याने ते आवडीने जास्त प्रमाणात खाल्ले जातात. मात्र दमट हवामानात तब्येत चांगली ठेवायची असेल तर अशाप्रकारचे पदार्थ अजिबात खाऊ नयेत. त्याऐवजी घरात बनवलेले ताजे, पचायला हलके आणि शरीराला पोषण देणारे पदार्थ आवर्जून खायला हवेत.
३. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम
उन्हाळ्याच्या दिवसांत दिवस मोठा असल्याने आपल्याला जास्त वेळ आहे असे वाटते. त्यामुळे अनेकदा आपण नेहमीपेक्षा जास्त व्यायाम करतो. पण या काळात जास्त ताकदीचा व्यायाम करणे आरोग्यासाठी अतिशय घातक असते. यामुळे आपल्याला प्रमाणाबाहेर थकवा येऊ शकतो.
आणखी काय करायला हवे...
१. कडूनिंबाची पाने पाण्यात घालून त्याने आंघोळ करणे.
२. उधवर्तन स्क्रब आणि त्रिफळा पावडर यांचा आंघोळीसाठी उपयोग करणे
३. सकाळी सूर्य उगवण्याच्या आधी किंवा किमान त्या वेळेपर्यंत झोपेतून उठावे.
४. हलका आहार आणि जास्तीत जास्त चालणे ठेवावे.