जन्म झाल्यापासून आपल्या शरीराची वाढ आणि विकास होत असतो. पण ही वाढ एका ठराविक मर्यादेपर्यंतच होते. त्यानंतर पुढील काळ ही झालेली वाढ चांगली राहावी यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारे काळजी घेत असतो. हाडांची वाढ हा शरीरातील वाढीचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. हाडं ठणठणीत असतील तर आपण सगळ्या गोष्टी योग्य पद्धतीने करु शकतो. ठराविक वयापर्यंत आपल्या शरीराचा विकास होत असतो. शरीरातील महत्त्वाच्या असलेल्या हाडांमध्ये अगदी लहान वयापासून कॅल्शियम एकत्रित होण्याची प्रक्रिया सुरू होते आणि साधारणपणे वयाच्या तिशीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहते. मात्र तिशीनंतर हाडांत कॅल्शियम जमा होण्याची प्रक्रिया कमी होते आणि हाडं ठिसूळ व्हायला सुरूवात होते. त्यामुळे एखादा लहान अपघात झाला तरी आपली हाडं लगेच तुटतात किंवा फ्रॅक्चर होतात. पण असे होऊ नये म्हणून आपण नियमित योग्य आहार घेतल्यास हाडांचे चांगल्या पद्धतीने पोषण होते आणि त्यामुळे आपली तब्येत चांगली राहण्यास मदत होते.
हाडांच्या मजबुतीसाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश कराल ?
हाडे चांगली राहावीत यासाठी त्यांना पुरेसा कॅल्शियम मिळण्याची आवश्यकता असते. कॅल्शियम हा केवळ फळं, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांतून मिळतो हे आपल्याला माहित असते. पण द जर्नल ऑफ न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार, कॅल्शियमचा सर्वात महत्त्वाचा स्त्रोत भाज्या असतात. विविध प्रकारच्या भाज्यांमधूनही शरीराला पुरेसा कॅल्शियम मिळतो असे या अभ्यासात म्हटले आहे. या संशोधनासाठी काही वयस्कर लोकांवर चाचणी करण्यात आली. अर्ध्या लोकांना ते नियमित घेत असलेला आहार घ्यायला सांगितला तर इतर अर्ध्या लोकांच्या आहारात आवर्जून ठराविक भाज्यांचा समावेश करण्यात आला. ज्यांच्या आहारात भाज्यांचा समावेश करण्यात आला होता त्या लोकांच्या हाडांची स्थिती ठराविक काळानंतर आधीपेक्षा जास्त चांगली असल्याचे लक्षात आले.
कोणत्या भाज्या, फळे हाडांसाठी सर्वात चांगल्या ?
हाडांची घनता वाढावी यासाठी सिमला मिर्ची, रताळे, टोमॅटो या भाज्या आणि स्ट्रॉबेरी, केळी, संत्री ही फळे सर्वात चांगली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लहान मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्या आहारात या भाज्या आणि फळांचा आवर्जून समावेश असायला हवा. रताळ्याच्या फोडी, कीस किंवा नुसती उकडलेली रताळीही छान लागतात. सिमला मिर्चीच्या भाजीबरोबरच सलाडमध्ये, पुलावमध्ये ही भाजी चांगली लागते. टोमॅटोचा तर आपण प्युरी, कोशिंबीर, चटणी अशा वेगवेगळ्या स्वरुपात वापर करु शकतो. त्यामुळे या भाज्या तुम्ही सलाड म्हणून, पोळीसोबत, भातासोबत किंवा सूपच्या स्वरुपातही खाऊ शकता. मात्र त्याचे आहारात पुरेसे प्रमाण असणे आवश्यक आहे. संतुलित आहार घेतला तर आपल्याला आरोग्याशी निगडीत कोणताही त्रास उद्भवणार नाही. त्यामुळे आपण घेत असलेल्या आहारातून पुरेसे पोषण मिळत नसेल तर ते आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे तब्येत ठणठणीत ठेवायची असेल तर आहारात सर्व गोष्टींचा प्रामुख्याने भरपूर भाज्या आणि फळांचा समावेश असायलाच हवा.
हाडांसाठी फक्त कॅल्शियम गरजेचे?
शरीरातील ९९ टक्के कॅल्शियम हा हाडे आणि दातांमध्ये असतो. मात्र हाडांची योग्य वाढ व्हावी यासाठी केवळ कॅल्शियम आवश्यक असतो असे आपल्याला वाटत असेल तर तसे नाही. हाडांसाठी कॅल्शियमबरोबरच इतर घटकही आवश्यक असतात. व्ह़िटॅमिन डी हाही हाडांसाठी महत्त्वाचा घटक आहे. हाडांतील टीश्यूच्या निर्मितीसाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असते. तसेच हाडांमध्ये कॅल्शियम शोषला जावा यासाठीही व्हिटॅमिन डीची आवश्यकता असते. हाडांना ऑस्टीओपोरॅसिस आणि फ्रॅक्चर होण्यापासून वाचवण्यासाठी व्हिटॅमिन केची आवश्यकता असते. व्हिटॅमिन सी मुळे शरीरात कोलेजनची निर्मिती होते आणि त्यामुळे हाडे आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. याबरोबरच मॅग्नेशियम, पोटॅशियम हे हाडांसाठी अतिशय उपयुक्त घटक असतात.