तेल हा आपल्या सगळ्यांच्याच स्वयंपाकातील अविभाज्य घटक आहे. (3 worst Cooking Oils ) तेलाशिवाय भारतीय स्वयंपाकातील बहुतांश पदार्थ होऊ शकत नाहीत. तेल आरोग्यासाठी चांगले असते तितकेच ते घातकही असते. त्यामुळे ते किती प्रमाणात, कोणत्या वेळेला आणि कोणते खावे याबाबत आपल्याला पुरेसे ज्ञान असायला हवे. सतत तेलकट पदार्थ खाल्ले तर आरोग्याच्या विविध तक्रारी उद्भवतात हे आपल्याला माहित आहे. इतकेच नाही तर चुकीचे तेल खाल्ले तरीही आरोग्याचे काही ना काही त्रास मागे लागतात. आपल्याला खोटं वाटेल पण आपण खात असलेल्या काही तेलांमध्ये असणाऱ्या घटकांमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
आपण अनेकदा बाहेरचे पदार्थ खातो यामध्ये कोणते तेल वापरलेले असते आपल्याला माहित नाही, पण त्यामुळे भविष्यात असे आजार होणार असतील तर ते आरोग्यासाठी निश्चितच घातक आहे. तेलामुळे शरीरातील पीएचचे संतुलन बिघडते आणि लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल, यकृताच्या तक्रारी, अल्सर, मूळव्याध यांसारख्या तक्रारी उद्भवतात. बाहेरच्या पदार्थांसाठी साधारणपणे व्हेजिटेबल ऑईल वापरले जाते. मात्र त्यामध्ये असणारे घटक कॅन्सर होण्यास कारणीभूत असल्याचे काही संशोधनांतून समोर आले आहे. त्यामुळे बाहेर खाताना आणि घरातही तेल वापरताना काळजी घेतलेली केव्हाही चांगली. पाहूयात कोणती तेले आरोग्यासाठी हानीकारक असतात...
१. सनफ्लॉवर, सोयाबिन तेल
ही तेले आपण साधारणपणे घरात स्वयंपाकासाठी वापरतो. मात्र या तेलांना गरम केल्यास त्यातून एल्डिहाइड नावाचा एक घटक निर्माण होतो. पदार्थाला फोडणी देण्यासाठी किंवा तळण्यासाठी आपण तेल गरम करुन मगच वापरतो. पण एल्डिहाईड या घटकामुळे तेलाचे ऑक्सिकरण होते आणि ते रेटिनोइक अॅसिडमध्ये बदलले जाते. हे घटक कॅन्सरच्या पेशींना जन्म देत असल्याने ते आरोग्यासाठी घातक असतात.
२. पाल्म, कॉर्न तेल
आपण बाहेर जे पदार्थ खातो त्यामध्ये किंवा पॅकेज्ड फूडमध्ये या तेलांचा प्रामुख्याने वापर केलेला असतो. पाकीटाच्या घटकांमध्येही पाल्म ऑईल असे स्पष्ट लिहीलेले असते. त्यामुळे बाहेरचे पदार्थ खाताना ते ठिकाण चांगले आहे की नाही याची खातरजमा करुन मगच खायला हवे. नाहीतर जिभेचे चोचले पुरवणे आपल्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते.
३. व्हेजिटेबल ऑईल
डिमोनफोर्ट विद्यापीठात करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार व्हेजिटेबल ऑईलमध्ये सामान्य तेलांपेक्षा २०० टक्के अधिक एल्डिहाइड हा घटक असतो. या तेलांमध्ये पॉलीअनसॅच्युरेटेड घटक अधिक असतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार असे तेल गरम केल्याने त्याला एकप्रकारचा वास येतो. त्यामुळे हे तेल आरोग्यासाठी घातक मानले जाते.