Join us   

रात्री काही केल्या लवकर झोपच येत नाही, असं का होतं? झोप न येण्याची ४ महत्त्वाची कारणं…

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2023 4:43 PM

4 Basic Causes of Sleepless night insomnia : योग्य वेळी पुरेशी झोप झाली नाही तर आरोग्याच्या समस्या मागे लागतात...

झोप ही आपल्या दैनंदिन व्यवहातली अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. रात्रीची ७ ते ८ तास पुरेशी झोप झालेली असेल तरच आपला पुढचा दिवस चांगला जातो. नाहीतर दिवसभर आपल्याला आळस आणि थकवा येत राहतो. झोप न झाल्याने अॅसिडीटी, डोकेदुखी अशा काही ना काही समस्या उद्भवत राहतात. पडल्या पडल्या झोप लागणारे खऱ्या अर्थाने सुखी असतात असं म्हटलं जातं. पण काही जणांना मात्र कितीही प्रयत्न केले तरी अजिबात झोप येत नाही. असं होण्यामागे बरीच कारणं असतात, या कारणांचा शोध घेऊन त्यावर वेळीच उपाययोजना केल्या तर आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. अन्यथा झोप पूर्ण न झाल्याने उद्भवणाऱ्या विविध समस्या मागे लागतात आणि मग काय करावे ते आपल्याला कळत नाही. झोप न येण्यामागे नेमकी काय कारणं असतात ते पाहूया (4 Basic Causes of Sleepless night insomnia)...

१. ताणतणाव 

डोक्यात येणारे असंख्य विचार आणि सततचे ताणतणाव हे झोप न येण्याचे एक महत्त्वाचे कारण असते. झोप न येण्याच्या महत्त्वाच्या कारणांपैकी १ असलेले हे कारण. तणावामुळे कोर्टीसोल हॉर्मोनची लेव्हल वाढते ज्यामुळे मेंदू अॅक्टीव्ह मोडमध्ये जातो. मेंदू अशाप्रकारे कार्यरत राहिला तर शरीर आणि डोकं यांना आराम मिळत नाही आणि त्यामुळे झोपही येत नाही. 

(Image : Google)

२. पाणी कमी पिण्याची सवय

अनेकांना दिवसभर पाणी पिण्याचे लक्षातच राहत नाही. मग एकदम घशाला किंवा तोंडाला कोरड पडली की पाणी प्यायले जाते. मात्र अशा लोकांना डीहायड्रेशनचा मोठ्या प्रमाणात त्रास होण्याची शक्यता असते. पाणी कमी प्यायल्याने नैराश्य येण्याची शक्यता असते आणि त्याचा झोपेवर परीणाम होतो. भरपूर पाणी प्यायलेले असेल तर पोट भरलेले राहते आणि गाढ-शांत झोप लागण्यास मदत होते. 

३. मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी ची कमतरता 

शरीरात मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन डी या घटकांची कमतरता असेल तरी त्याचा झोपेवर परीणाम होतो. या दोन्ही गोष्टी शरीरासाठी अत्यावश्यक असून त्या योग्य प्रमाणात मिळाल्या नाहीत तर झोपेचा पॅटर्न बदलण्याची शक्यता असते. 

४. प्रमाणापेक्षा जास्त कॅफीन घेणे 

आपल्याकडे अनेकांना सतत चहा आणि कॉफी घेण्याची सवय असते. कॅफेनमुळे शरीरातील एड्रीनल हॉर्मोन वाढतो आणि शरीर एकदम अॅक्टीव आणि एनर्जेटीक होते. त्यामुळे दिवसभर चहा-कॉफी कमी प्रमाणात घ्यावी आणि झोपतानाही चहा-कॉफीचे सेवन टाळायला हवे. तसेच दिवसभर बैठे काम असेल तरी रात्रीच्यावेळी झोप येणे अवघड होते.  

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल