ओलं नारळ खाण्यास सगळ्यांनाच आवडतं. पण सुकं खोबरं खायला मात्र जिवावर येतं. पौष्टिकतेच्या बाबतीत ओल्या नारळाचाच विचार केला जातो. ओलं नारळ खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच सुकं खोबरं चावून खाण्याचे, आपल्या आहारात कोणत्या न कोणत्या स्वरुपात सुक्या खोबर्याचा समावेश करण्याचे अनेक फायदे आहेत. सुकं खोबरं हे प्रामुख्यानं हदय, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं तसेच महिलांच्या आरोग्यासाठीही सुक्या खोबर्याचे विशेष फायदे आहेत.
Image: Google
एखादी गोष्ट खायला सांगितली आहे म्हणून खायची असं म्हटलं तर ते होत नाही. पण अमूक कारणांसाठी तमूक खाणं गरजेचं आहे , त्याचे हे विशिष्ट फायदे आहेत हे समजून घेतलं तर मग तो पदार्थ आवर्जून खाल्ला जातो. सुक्या खोबर्यातले हेच गुण जाणून घेतले तर सुकं खोबरं आवर्जून खाल्लं जाईल .
सुकं खोबरं खाणं का महत्त्वाचं?
1. सुकं खोबरं आपण कधीही, कुठेही खाऊ शकतो. भूक लागली की भेळ, फरसाण, बिस्किटं हे पदार्थ खाण्यापेक्षा पर्समधे एक छोट्या डब्यात सुक्या खोबर्याचा किस ठेवणं, किंवा सुक्या खोबर्याचे तुकडे ठेवणं लाभदायक ठरतं. मधेच लागणारी भूक हे सुकं खोबरं खाऊन तर शमतेच शिवाय शरीरालाही त्याचा फायदा होतो. दोन वेळेच्या जेवणात जे पदार्थ आपण खातो तेच फक्त आरोग्यावर परिणाम करतात असं नाही. तर मधल्या काळात खाल्ले जाणारे पदार्थही शरीरावर चांगले वाईट परिणाम करत असतात. मधल्या वेळेत भूक लागली असता सुकं खोबरं चावून खाल्लं तर भूक शमते, रक्ताचा प्रवाह सुरळीत राहातो. सुक्या खोबर्यात फिनॉलिक हा घटक असतो जो अँण्टिऑक्सिडण्टससारखा काम करतो. तसेच सुक्या खोबर्यामुळे पेशींचं ऑक्सिडेशन होण्याचं टळतं. सुक्या खोबर्यातील फायबरमुळे पोट भरल्यासारखं राहातं, जेवणापर्यंत भूक लागत नाही.
Image: Google
2. भारतातल्या महिलांमधे लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिलांनी मधे मधे सुकं खोबरं खाणं हे फायदेशीर मानलं जातं. सुक्या खोबर्यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे दिवसभरात मधून मधून थोडं सुकं खोबरं चावून खाल्ल्यानं रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. गुळ खोबरं एकत्रं खाणं किंवा सुक्या खोबर्याचा समावेश केलेले पौष्टिक लाडू खाल्ल्याने महिलांचं आरोग्य चांगलं राहातं. प्रसूतीनंतर महिलांना सुकं खोबरं आणि डिंक मेथीचे लाडू खाऊ घालतात ते याचसाठी.
Image: Google
3. रोगप्रतिकारशक्ती वाढवून आजारांचं आणि औषधांचं प्रमाण कमी करायचं असेल तर सुकं खोबरं खाण्याला पर्याय नाही. सुक्या खोबर्यात प्रथिनं, जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शिअम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. थोडं सुकं खोबरं रोज चावून चावून खाण्याची सवय लावली तर आपली रोगप्रतिकाराशक्तीही वाढते. सुकं खोबरं रोज खाल्ल्यानं संसर्गजन्य आजार दूर राहातात. त्वचेचा पोतही चांगला होतो.
4. जर स्वत:ला किंवा घरात कोणा इतरांना संधिवात असेल किंवा ऑस्टियोपोरोसिस असेल तर सुकं खोबरं अवश्य खावं. सुकं खोबरं नियमित खाल्ल्याने सांधेदुखी कमी होते, हाडांची झीज होत नाही. तसेच इतर गंभीर आजारांचा धोकाही कमी होतं. त्यामुळे सुक्या खोबर्याचा एक तुकडा खूप फायदेशीर असतो एवढं लक्षात ठेवून तो रोज चावून खाण्याची सवय लावल्यास आरोग्य उत्तम राहील हे नक्की!
Image: Google
सुक्या खोबर्याचा समावेश आहारात करण्यासाठी खोबर्याची चटणी, डिंक खोबरं गूळ किंवा खजूर आणि खोबरं, शेंगदाणे, गूळ आणि खोबरं यांचे लाडू करणं, रश्याच्या भाज्यांमध्ये आवर्जून सुक्या खोबर्याचा वापर करणं , पोहे, मसाले भात यावर भरपूर प्रमाणात सुकं खोबरं भुरभुरणं हे आरोग्यासाठी फायदेशीर असतं. त्यामुळे आपल्या स्वत:च्या आरोग्याचा विचार करुन स्वयंपाक घरातलं सुकं खोबरं नेहेमी राहील याची काळजी घ्या.