पोटभर जेवण झालं की ढेकर येणे ही चांगली गोष्ट आहे. त्यामुळे शरीरातील अनावश्यक हवा बाहेर पडण्यास मदत होते. पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी हे गॅसेस बाहेर पडणे अतिशय महत्त्वाचे असते. मात्र हे ढेकर करपट असतील तर मात्र आपल्याला अक्षरश: नकोसे होते. काही वेळा हे ढेकर इतक्या जास्त प्रमाणात येतात की ते एकदा यायला लागले की थांबता थांबत नाहीत. हे ढेकर थांबवण्यासाठी नेमकं काय करायचं हेही आपल्याला समजत नाही. असे करपट ढेकर आले की आपलं तोंड तर आंबट होऊन जातंच पण घशातही अॅसिडीक पदार्थ आल्यानं नकोसं वाटतं. पोट बिघडणे, अपचन, अॅसिडीटी यांसारख्या पचनाशी निगडित समस्यांमुळे करपट ढेकर येण्याचा त्रास होतो. तुम्हाला सतत अशाप्रकारचा त्रास होत असेल तर काही घरगुती उपायांनी या समस्येवर तोडगा काढता येतो. आता हे उपाय कोणते आणि ते कसे करायचे ते समजून घेऊया (4 Easy home Remedies for indigestion or burping after meal)...
१. बडीशोप
जेवण झाल्यानंतर खाल्लेले अन्न पचावे यासाठी आपण आवर्जून बडीशोप खातो. बडीशोपमध्ये अँटीऑक्सिडंटस आणि खनिजे असतात ज्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे चांगले पचन होते. जेवण झाल्यावर बडीशोप आणि साखर खाल्ल्यास पचनक्रियेला गती मिळते आणि करपट ढेकर येण्याचा त्रास कमी होतो. त्यामुळे जेवण झाल्यावर आवर्जून बडीशोप खायला हवी.
२. लिंबू पाणी आणि काळं मीठ
एकामागे एक खूपच करपट ढेकर येत असतील तर काळं मीठ आणि लिंबू पाणी घेणे हा उत्तम उपाय आहे. यामुळे खाल्लेले अन्न पचण्यास मदत होते आणि ढेकर येणे कमी होते. लिंबातील अॅसिडीक गुण करपट ढेकर येण्याची समस्या दूर करते तर पीएच स्तर कमी करण्यासाठीही या पाण्याचा उपयोग होतो.
३. काळं मीठ आणि भाजलेलं जीरं
जीरं हे उत्तम पाचक आहे हे आपण अनेकदा ऐकतो. त्यामुळेच भाजलेल्या जिऱ्याची पूड आणि काळं मीठ जेवणानंतर घेतल्यास पोटातील गॅसेस, अॅसिडीटी दूर होण्यास मदत होते. पाण्यात जीरं पूड आणि काळं मीठ घालून प्यायल्यास पचनाच्या तक्रारी दूर होतात.
४. हिंग
हिंग हे पचनासाठी अतिशय उत्तम असे नैसर्गिक औषध मानले जाते. कोमट पाण्यातून हिंग घेतल्यास पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. म्हणूनच जेवणानंतर काही जण हिंगाची गोळीही खातात. यामुळे ढेकर येण्याची समस्या दूर होण्यास मदत होते.