ऑफीसमध्ये किंवा घरातही आपण सतत काही ना काही खातो नाहीतर चहा किंवा कॉफी पितो. पण ते झाल्यावर आपण तोंड धुतोच असे नाही. अशावेळी खाल्लेल्या अन्नाचे कण दातात राहून ते सडतात आणि दात किडायला सुरुवात होते. इतकेच नाही तर खाल्लेल्या अन्नाचे कण दातांवर राहील्याने दात पिवळे पडायला लागतात. आपण सकाळी उठल्यावर आवर्जून ब्रश करतो. पण रात्री झोपताना किंवा दिवसभरात खाल्ल्यावर मात्र आपण ब्रश करतोच असे नाही. त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे कण दातात अडकतात आणि दात खराब होतात.
सुरुवातीला आपण या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो पण दात किडायला आणि खूपच पिवळे दिसायला लागले की आपल्याला जाग येते. मात्र तेव्हा वेळ निघून गेलेल असते.आपले दात मजबूत आणि पांढरे शुभ्र असावेत यासाठी काही सोपे उपाय करण्याची आवश्यकता आहे. घरच्या घरी नैसर्गिक गोष्टींचा वापर करुन हे उपाय केल्यामुळे दात दिसायला तर चांगले दिसतातच पण ते मजबूत होण्यासही मदत होते.पाहूयात घरच्या घरी करता येतील असे काही सोपे उपाय (4 Easy home remedies for whitening yellow teeth).
१. तीळ
तीळ दिसायला आकाराने लहान असतील तरी त्याचे आरोग्यासाठी अतिशय चांगले उपयोग असतात. थंडीच्या दिवसांत शरीरात उष्णता निर्माण करणारे तीळ दातांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. तीळ चावून खाल्ल्यास दात स्वच्छ होण्यास मदत होते. तसेच तीळात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्याने दातांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.ब्रशवर तीळ घेऊन त्याने दात घासल्यास दातांचा पिवळेपणा कमी होतो.
२. बेकींग सोडा
१ चमचा बेकींग सोडा घेऊन त्यामध्ये थोडे पाणी घाला. हे मिश्रण हलवून त्याची पेस्ट तयार करा. टूथब्रश या पेस्टमध्ये बुडवून त्याने दात स्वच्छ घासा. ब्रश गालोकार फिरवल्यास दातांवर अडकलेले अन्नाचे कण निघून जाण्यास मदत होईल. यानंतर पाण्याने भरपूर चुळा भरा. एक दिवसाआड हा प्रयोग नक्की करायला हवा. तुम्ही दिवसातून दोन वेळा दात घासत असाल तर एकदा टुथपेस्टऐवजी बेकींग सोडा वापरा. यामुळे दातांचे किडीपासून संरक्षण होईल आणि पिवळेपणाही कमी होईल.
३. व्हिटॅमिन सीयुक्त पदार्थ
किवी, संत्री, मोसंबी, आवळा,लिंबू, शिमला मिरची यांसारखी फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. दातावर आलेला पिवळा थर दूर करण्यासाठी तसेच दातांच्या मजबुतीसाठी या घटकांचा आहारात समावेश करणे अतिशय फायदेशीर ठरते.
४. ग्रीन टी
आपल्यापैकी अनेक जण अगदी नियमितपणे ग्रीन टी पितात. वजन कमी करण्यासाठी किंवा बॉडी डीटॉक्स करण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. त्याचप्रमाणे दातांच्या आरोग्यासाठीही ग्रीन टी अतिशय उपयुक्त असतो. तोंडात तयार होणारे बॅक्टेरीया नियंत्रणात राहण्यासाठी ग्रीन टी फायदेशीर असतो.