थंडीच्या दिवसांत हवेत गारठा असल्याने खाल्लेले अन्न चांगले पचते. तसेच तब्येत कमावण्यासाठी हा काळ अतिशय चांगला असतो त्यामुळे या काळात पौष्टीक पदार्थ खाऊन, व्यायाम करुन वर्षभरासाठी तब्येत कमावली जाते. थंडीत शरीराला ऊर्जेची आणि पौष्टीक घटकांची आवश्यकता असल्याने या काळात सुकामेवा, भाजीपाला, फळं अशा पौष्टीक आणि तीळ, गूळ, बाजरी असे उष्णता देणारे पदार्थ खाल्ले जातात. पण हिवाळ्यात आवर्जून खाल्ले जाणारे काही पदार्थ असतात ते कोणते आणि ते खाल्ल्याने शरीराला नेमके कोणते घटक मिळतात हे समजून घ्यायला हवे. पाहूयात या काळात आहारात कोणत्या गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा, जेणेकरुन शरीराला ऊर्जा मिळण्यास मदत होईल (4 foods to increase metabolism and keep you active during winter)...
१. कार्बोहायड्रेटस
कार्बोहायड्रेटस आपल्या आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. ओटस, ब्राऊन राईस, फळं यांच्यामध्ये कार्बोहायड्रेटसचे प्रमाण जास्त असते. वरील पदार्थांमध्ये कार्बोहायड्रेसटसोबतच फायबर, व्हिटॅमिन्स, खनिजे यांचे प्रमाण चांगले असते. त्यामुळे शरीराचे चांगले पोषण होण्यास मदत होते.
२. मसाले
मसाल्याचे पदार्थ ही भारतीयांची खास ओळख आहे. भारतीय पदार्थांमध्ये मसाल्यांचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. हे मसाले आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. दालचिनी, काळी मिरी, जीरे यांसारखे मसाल्याचे पदार्थ मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी आणि इन्शुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. तसेच पचनक्रिया, सर्दी यांसारख्या हिवाळ्यातील तक्रारींवरही मसाल्याचे पदार्थ उपयुक्त ठरतात.
३. ओली हळद
थंडीच्या दिवसांत बाजारात आवर्जून दिसणारी गोष्ट म्हणजे ओली हळद. हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लमेटरी गुणधर्म असतात. हे घटक हृदयासाठी आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे या काळात ओल्या हळदीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. या हळदीचे लोणचे अतिशय छान लागते तसेच ते ४ ते ६ महिने टिकते त्यामुळे आहारात त्याचा आवर्जून समावेश करावा.
४. रताळी
रताळी हे कंदमूळ आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. मेटाबॉलिझम वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. यातील कार्बोहायड्रेटस आणि पोषक घटक शरीराला ऊर्जा मिळावी म्हणून फायदेशीर असतात.