सकाळी झोपेतून उठल्यावर अनेकांना पोट साफ झालं की भूक लागते. अशावेळी एकतर आपण पाणी पितो आणि त्यानंतर चहा किंवा कॉफी घेतली जाते. केवळ सकाळीच नाही तर अनेकदा सकाळचा नाश्ता केल्यानंतरही कामाच्या गडबडीत आपले दुपारचे जेवण स्कीप होते. मग मिटींग्ज किंवा आणखी काही आटोपले की ४ वाजता आपल्याला जेवायची आठवण होते. त्यामुळे नाश्त्यापासून ते जेवणापर्यंत जवळपास ७-८ तासांचा वेळ मधे गेलेला असतो. अशावेळी पोट बराच काळ रिकामे असताना आपण त्यावर काही पदार्थ खाल्ले तर ते आरोग्यासाठी फायदेशीर न ठरता नुकसानकारक ठरतात. हे पदार्थ कोणते आणि ते खाल्ल्याने नेमका काय तोटा होतो याविषयी आहारतज्ज्ञ श्वेता शाह-पांचाळ काही महत्त्वाच्या टिप्स देतात. त्या कोणत्या पाहूया (4 foods you should not eat on empty stomach) ...
१. फ्रूट ज्यूस
रिकाम्या पोटी शक्यतो फळांचे ज्यूस घेऊ नयेत. कारण त्यामुळे तुमचे स्वादुपिंड आणि यकृत यांवरचा ताण वाढण्याची शक्यता असते. तसेच ज्यांना शुगर आहे त्यांची रक्तातील साखर यामुळे वाढण्याची शक्यता असते. एखाददुसरे वेळी तुम्ही असे केले तर ठिक आहे. पण नियमितपणे रिकाम्या पोटी ज्यूस घेतल्यास शरीरातील इन्शुलिनची पातळी नियंत्रणात ठेवणे अवघड होते.
२. दही
दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्री बायोटीक्स मोठ्या प्रमाणात असतात. पण त्यातले हे दही आपण रिकाम्या पोटी खाल्ले तर त्यातील पोषक घटक शरीराला मिळत नाहीत. रिकाम्या पोटी दही खाल्ले तर अॅसिडीटी होण्याचीही शक्यता असते.
३. चहा-कॉफी
रात्रभर शांत झालेली पचनक्रिया एकाएकी खूप अॅसिडीक होण्यामागे चहा-कॉफी हे महत्त्वाचे कारण असते. सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी घेतल्यास गॅसेस, ब्लोटींग, अॅसिडीटी अशा पचनाशी निगडीत विविध समस्या उद्भवण्याची शक्यता असते.
४. मसालेदार पदार्थ
बऱ्याच जणांना सकाळचा नाश्ता हा मसालेदार करायला आवडतो. यामध्ये तळलेले पदार्थ, मिसळसारखे तिखट पदार्थ यांचा समावेश असण्याची शक्यता असते. पण अशा पदार्थांमुळे पोटावर ताण येतो आणि अॅसिडीटीची समस्या वाढण्याची शक्यता असते.