Join us   

नव्या वर्षात राहाल एकदम फिट अँड फाईन, ४ टिप्स- शरीरासोबतच मनानेही ताजेतवाने राहायचे तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2023 3:12 PM

4 Health Resolution for new year : आपल्याला झेपतील, होतील असेच संकल्प करायला हवेत.

नवीन वर्ष म्हणजे नव्या इच्छा, नव्या आकांक्षा आणि नवी स्वप्न घेऊन येणारा काळ. इंग्रजी नवीन वर्ष सर्वांना सुखाचं आणि समाधानाचं जावं अशा आपण एकमेकांना शुभेच्छा देतो खऱ्या. पण हे वर्ष खऱ्या अर्थाने आरोग्यदायी, सुंदर आणि आनंदाचे व्हावे यासाठी नवीन वर्षात ठरवून आपण काही गोष्टी करायला हव्यात. नव्या वर्षासाठी आपण काही संकल्प करतो पण पुढच्या काही दिवसांतच ते संकल्प हवेत विरुन जातात. पण असे होऊ नये आणि आपल्याला झेपतील, होतील असेच संकल्प करायला हवेत. संकल्प न करता थेट कृती केली तरी हरकत नाही. पण ठरवलेल्या गोष्टी नवीन वर्षात आवर्जून व्हायला हव्यात. या गोष्टी नियमित केल्यास आपल्या शारीरिक, मानसिक आरोग्यास त्याचा नक्कीच फायदा होईल. अशा गोष्टी कोणत्या आणि त्या दिर्घकाळ फॉलो करण्यासाठी काय करायचे पाहूया (4 Health Resolution for new year).

१. व्यायाम 

सोमवार, महिन्याची १ तारीख, वर्षाची सुरुवात जवळ आली की आपण काहीही झालं तरी व्यायाम करणारच असा संकल्प जरुर करतो. पण आपल्याकडून हा संकल्प पुढचा महिनाभरही टिकत नाही. असे होऊ नये आणि खरंच आपण नियमित व्यायाम करावा यासाठी रोज ठरवून दिवसातला कोणत्याही वेळी १५ ते २० मिनीटे चालण्यापासून सुरुवात करावी. काही दिवस इतके केले की पुढचा टप्पा वाढवावा. 

(Image : Google)

२. छंद 

छंद ही आपल्या  मानसिक आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. पण रोजच्या धावपळीत आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. असे न करता नवीन वर्षात आठवड्यातले काही तास तरी आपल्या छंदासाठी राखून ठेवायला हवेत. यामुळे आपण मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यास नक्कीच मदत होईल. आपल्या आवडीची एखादी गोष्ट केल्याने मनाने फ्रेश राहण्यास त्याचा फायदा होईल. 

३. ताण 

ताण हा प्रत्येक व्यक्तीला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर येतोच. यामध्ये सामान्यपणे व्यावहारीक गोष्टी, आर्थिक गोष्टी, आरोग्य, नातेसंबंध या गोष्टींचा ताण जास्त असतो. पण या ताणाचे योग्य पद्धतीने नियोजन केल्यास आपण मानसिकरित्या सक्षम होण्यास मदत होते. त्यामुळे भावनिकदृष्ट्याही आपण स्वत:ला सावरु शकतो. यासाठी ध्यान, प्राणायाम अशा मन:शांतीशी निगडीत गोष्टींचा समावेश करावा. 

(Image : Google)

४. आहार विहार

आपण अनेकदा बाहेर खायचे नाही, व्यसन करायचे नाही, वेळेत झोपायचे हे सगळे ठरवतो पण आपल्याकडून ते पाळले जातेच असे नाही. पण आरोग्य उत्तम ठेवायचे असेल तर आहाराकडे लक्ष देणे अतिशय गरजेचे आहे. जंक फूड, पॅकेज फूड, व्यसने यांचा आरोग्यावर विपरीत परीणाम होत असून त्यापासून अवश्य दूर राहायला हवे.

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलनववर्ष