Join us   

थोडं काम केलं की लगेच थकवा येतो? आहारात घ्यायलाच हव्यात ४ गोष्टी, राहाल कायम फ्रेश-ताजेतवाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2023 3:34 PM

4 High Energy Foods one should add in Diet to get rid from tiredness : सतत थकवा जाणवत असेल तर आहारात काही गोष्टींचा अवश्य समावेश करायला हवा.

सततची घरातली कामं, ऑफीस, सणवार, येणारजाणारे अशा सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळता सांभाळता महिलांना अनेकदा खूप थकवा येतो.लग्नानंतर अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्या आणि सतत आपण परफेक्ट असलं पाहिजे या अट्टाहासापायी आपण स्वत:ला खेचत राहतो. पण यामुळे आपण मनाने, शरीराने किती थकतो हे अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही. मानसिक थकव्याबरोबरच शरीरात असणाऱ्या विविध प्रकारच्या कमतरता हेही महिलांच्या थकव्यामागचे एक महत्त्वाचे कारण असू शकते. महिलांमध्ये साधारणपणे डी व्हिटॅमिन, कॅल्शियम, बी १२ आणि लोह, हिमोग्लोबिन यांची कमतरता असल्याचे दिसते (4 High Energy Foods one should add in Diet to get rid from tiredness). 

या कमतरतांमुळे अनेकदा अंगदुखी, सतत आराम करावासा वाटणे, उत्साही न वाटणे अशा बऱ्याच तक्रारी भेडसावतात. मात्र रोजच्या धबडग्यात आपण या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो आणि रोजची कामं रेटत राहतो. आहारातून पुरेसे पोषण होत नसल्याने काही वेळा या सगळ्या तक्रारी उद्भवतात. पण त्याकडे दुर्लक्ष न करता वेळीच योग्य त्या उपाय योजना केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. सतत थकवा जाणवत असेल तर आहारात काही गोष्टींचा अवश्य समावेश करायला हवा. ज्यामुळे शरीराची ताकद टिकून राहण्यास मदत होते. पाहूयात हे पदार्थ कोणते आणि त्याचा शरीराला कशाप्रकारे फायदा होतो.  

(Image : Google)

१. होल ग्रेन्स

होल ग्रेन्स प्रकारात मोडणारी धान्ये म्हणजेच किनोआ, ओटस, ब्राऊन राईस यांसारखी आरोग्यासाठी उपयुक्त असणारी धान्ये अवश्य खायला हवीत. यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन्स चांगल्या प्रमाणात असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी ही धान्ये फायदेशीर ठरतात. मैदा, पांढरा तांदूळ यांपेक्षा ही धान्ये आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असल्याने त्यांचा आहारात समावेश करावा.

२. सर्व रंगांची फळे

फळं आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात त्यामुळे आहारात नियमितपणे फळांचा समावेश करायला हवा. नेहमी तीच ती फळे खाण्यापेक्षा आहारात विविध रंगांची फळे असायला हवीत. त्यामुळे शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन्स आणि फायबर्स यांसारखी पोषक तत्त्वे मिळण्यास मदत होते. व्हिटॅमिन सी असणारी फळे आवर्जून खायला हवीत. 

३. रंगीत भाज्यांचा समावेश वाढवा

भारतात लाल, हिरव्या, केशरी, जांभळ्या, पिवळ्या, पांढऱ्या अशा विविध रंगांच्या भाज्या उपलब्ध असतात. या सगळ्या रंगांच्या भाज्या आपल्या आहारात आवर्जून असायला हव्यात. भाज्यांमध्ये व्हिटॅमिन, खनिजे यांसारखे घटक मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. तसेच पालेभाज्या आणि गडद रंगाच्या भाज्यांचा आहारात आवर्जून समावेश करावा. 

(Image : Google)

४. दूध 

दूध हा शरीराला पोषण देणारा एक महत्त्वाचा घटक असतो. दुधआतून कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी यांसारखे आवश्यक घटक असतात. हाडे, दात, स्नायू यांसारख्या अवयवांसाठी दूध अतिशय फायदेशीर असल्याने शरीराचे पोषण होण्यासाठी आहारात दुधाचा अवश्य समावेश करायला हवा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलआहार योजना