Join us   

थंडीत पोट साफ होण्यात अडचणी? डॉक्टर सांगतात, ४ सोपे उपाय, कॉन्स्टीपेशनची समस्या होईल दूर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2022 2:24 PM

4 Home Remedies to Relive Constipation Problem : आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास कॉन्स्टीपेशनची समस्या दूर होण्यास मदत होते.

ठळक मुद्दे पोट नीट साफ झाले नाही की बराच काळ अस्वस्थपणा राहतो. असे होऊ नये यासाठी आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास त्याचा कॉन्स्टीपेशनची समस्या दूर होण्यास चांगला फायदा होतो

फिशर आणि कॉन्स्टीपेशन या समस्या हल्ली अतिशय सामान्य असून आपल्यापैकी अनेक जण यामुळे हैराण असल्याचे आपण पाहतो. थंडीच्या दिवसांत तर पाणी कमी प्यायले जात असल्याने पोट साफ होण्याची आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते. फिशर म्हणजेच संडासच्या जागेला चीरा पडल्यासारखे होते आणि त्याठिकाणी खूप आग होते. हा भाग जास्त कोरडा पडला तर तिथून रक्त येण्याचीही शक्यता असते. बद्धकोष्ठता झाल्यास आपल्याला संडासला जोर द्यावा लागतो आणि त्यामुळे पोटावर किंवा इतर अवयवांवर ताण येतो (4 Home Remedies to Relive Constipation Problem). 

बद्धकोष्ठतेमुळे शरीरातील अनावश्यक घटक बाहेर न पडल्याने अपचन, अॅसिडीटी यांसारख्या समस्या उद्भवण्याचीही शक्यता असते. अशावेळी आपण काही घरगुती उपाय करतो किंवा जास्तच त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेतो. पण बद्धकोष्ठता म्हणजेच कॉन्स्टीपेशनचा त्रास होऊच नये किंवा होत असेल तर तो कमी व्हावा यासाठी घरच्या घरी कोणते उपाय करावेत याविषयी वैद्य मिहीर खत्री काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास ही कॉन्स्टीपेशनची किंवा फिशरची समस्या दूर होण्यास मदत होते. 

(Image : Google)

१. पपई 

शरीरातील अनावश्यक घटक मुलायम करण्यासाठी आवश्यक असणारे घटक पपईमध्ये असल्याने पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत असेल तर रोज पपई खायला हवी. 

२.  काळे मनुके

१० ते १५  काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी ते खावेत. याचा पोट साफ होण्यास चांगला उपयोग होतो.

३. व्हेज सूप 

थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. तसेच पचनक्रिया सुरळीत होण्यासाठीही या सूपचा अतिशय चांगला उपयोग होतो. त्यामुळे रात्रीच्या जेवणात व्हेज सूप घ्यावे ज्यामुळे सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. 

४. दूध आणि तूप 

रात्री झोपायच्या आधी १ कप कोमट दूधात १ चमचा गाईचे तूप घालून प्यावे. यामुळे आतड्यांना चांगले वंगण मिळते आणि संडासला जोर द्यावा लागत नाही.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना