Join us   

थंडीत दात अचानक ठणकायला लागले? ४ उपाय, दातदुखी होईल कमी, मिळेल आराम...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2024 11:41 AM

4 Important tips for oral health tooth ache in winter : थंडीत हाडांचे दुखणे जसे वाढते त्याचप्रमाणे हवेतील गारठ्यामुळे दातदुखीही वाढते.

थंडीच्या दिवसांत सर्दी-खोकला, दमा, त्वचेच्या आणि हाडांच्या समस्या उद्भवतात हे आपल्या सगळ्यांनाच माहित असते. पण यासोबतच आरोग्याची आणखी एक समस्या उद्भवते ती म्हणजे दातांचे दुखणे. साधारणपणे थंडीच्या दिवसांत दातांचे दुखणे डोकं वर काढते. दातांमध्ये खाल्लेल्या अन्नाचे कण अडकून राहतात आणि दात किडतात. दातांना लागलेली ही किड आपल्या लगेच लक्षात येत नाही. पण ती जेव्हा आतपर्यंत जाते आणि नसांना इजा करायला लागते तेव्हा आपले दात अचानक ठणकायला लागतात. एकदा दात दुखायला लागले की काहीच सुधरत नाही इतके हे दुखणे भयंकर असते. थंडीत हाडांचे दुखणे जसे वाढते त्याचप्रमाणे हवेतील गारठ्यामुळे दातदुखीही वाढते. दातांचे हे दुखणे उद्भवू नये आणि उद्भवले तरी वेळीच आटोक्यात यावे यासाठी करता येतील असे ४ सोपे उपाय कोणते ते पाहूया (4 Important tips for oral health in winter)...

१. भरपूर पाणी प्यायला हवे

थंडीच्या दिवसांत गारठ्यामुळे साधारण कमी पाणी प्यायले जाते. यामुळे डिहायड्रेशन तर होतेच पण तोंडात नेहमीपेक्षा कमी प्रमाणात लाळ निर्माण होते. लाळ ही अॅसिड कमी करण्यासाठी आणि पीएचचा हेल्दी बॅलन्स करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. त्यामुळे थंडीच्या दिवसांत दात आणि हिरड्या यांना नुकसान पोहोचवणाऱ्या बॅक्टेरीयांपासून सावध राहण्यासाठी भरपूर पाणी प्यायला हवे. 

(Image : Google)

२. तोंडाच्या आरोग्याकडे लक्ष द्यायला हवे

दात नियमितपणे फ्लोराइड फ्री टूथपेस्ट आणि हलक्या दातांच्या ब्रशने घासायला हवेत. दिवसातून किमान २ वेळा दात स्वच्छ घासणे महत्त्वाचे आहे. दातांमध्ये अडकलेले कण आणि घाण निघून जाण्यासाठी न चुकता फ्लॉसिंग करणे गरजेचे आहे. याबरोबरच अँटीसेप्टीक माऊथ वॉशचाही उपयोग करु शकतो. 

३. संतुलित आहार गरजेचा 

थंडीच्या दिवसांत गोड खाण्याचे, चहा-कॉफी जास्त पिण्याचे प्रमाण वाढते. पण याचा दातांवर विपरीत परीणाम होतो. त्यामुळे आहारात हेल्दी नटस, सीडस यांचा समावेश करायला हवा. यामुळे केवळ जंक फूड खाणे कमी होते असे नाही तर तोंडातली लाळ वाढण्यासाठीही याचा चांगला उपयोग होतो. 

४. हिरड्यांची काळजी

थंडीच्या दिवसांत ओठ फुटतात आणि हिरड्याही थोड्या सेन्सेटीव्ह होतात. पण हिरड्यांना इजा होऊ नये यासाठी थोडे मऊ दात असणाऱ्या ब्रशने दात घासायला हवेत. त्यामुळे हिरड्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल. अन्यथा हिरड्यांना इजा पोहोचून त्या कमकुवत होतील. 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइलदातांची काळजी