पावसाळ्याच्या दिवसांत आपला अग्नी मंद होत असल्याने नकळत त्याचा आपल्या पचनशक्तीवर परीणाम होतो. या काळात पचनशक्ती क्षीण होते आणि खाल्लेले अन्न नीट पचत नाही. भूक मंदावणे, थोडे खाल्ले तरी करपट ढेकर येत राहाणे, गॅसेस, अॅसिडीटी यांसारख्या समस्या पावसाळ्याच्या दिवसांत भेडसावतात. मात्र पोट वेळच्या वेळी नीट साफ झाले नाही तर त्याचा आपल्या एकूण आरोग्यावर परीणाम होतो आणि सगळे आरोग्यच बिघडून जाते. पण असे होऊ नये आणि आपली पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी आपण योग्य ती काळजी घ्यायला हवी. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दीक्षा भावसार पावसाळ्यात पचनक्रिया सुरळीत राहावी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स देतात (4 lifestyle Tips for good digestion in Monsoon) .
१. पाणी पिणं का महत्त्वाचं
पाणी पुरेशा प्रमाणात प्यायले नाही तर फक्त डिहायड्रेशन होत नाही तर पोट कोरडे पडायला लागते. पचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी आणि खाल्लेल्या अन्नाचे योग्यरितीने पचन व्हावे यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी पिणे आवश्यक असते. अन्नातील पोषक घटक शरीराला मिळावेत यासाठी पाण्याचा चांगला उपयोग होतो. दिवसातून किमान ८ ग्लास पाणी प्यावे असे सांगितले जाते मात्र हे प्रमाण आपले वजन, ऋतू आणि आपण करत असलेल्या अॅक्टीव्हीटीज यानुसार बदलते.
२. पचन चांगले होण्यासाठी व्यायाम आवश्यक
अन्नाचे चांगले पचन व्हावे आणि पोटाच्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी नियमित व्यायाम करणे आवश्यक असते. चालणे, धावणे, योगा, सायकलिंग अशा कोणत्याही स्वरुपाचा व्यायाम किमान ३० मिनीटे करायला हवा. सुरुवात लाईट वेट व्यायामापासून करावी, हळूहळू वेळ आणि काठिण्य वाढवत न्यावे.
३. कोणते पदार्थ टाळावेत ?
चीज, तळलेले पदार्थ, फास्ट फूड पचनक्रियेसाठी चांगले नसतात. तसेच चहा, कॉफी, व्हिनेगर आणि आंबट फळांमुळेही पचनक्रियेवर ताण येण्याची शक्यता असते. कोबी, बिन्स व कार्बोनेटेड ड्रींक्समुळे गॅसेसची समस्या उद्भवू शकते. त्यामुळे हे सगळे पदार्थ शक्यतो टाळलेलेच बरे.
४. जेवणानंतर आवर्जून टाळायला हव्यात अशा गोष्टी
जेवण झाल्या झाल्या लगेचच आंघोळ करणे आणि चालणे टाळावे. दुपारी २ नंतर जेवण करणे योग्य नाही. जेवण झाल्यावर लगेच झोपणे योग्य नाही. रात्रीच्या वेळी आहारात दह्याचा समावेश करणे. पोटाचे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर या गोष्टी आवर्जून टाळायला हव्यात. याकडे लक्ष न दिल्यास वात, कफ आणि पित्त हे दोष शरीरात वाढण्याची शक्यता असते.