पाणी पिणे ही आपल्या एकूण आहाराच्या बाबतीतली सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या शरीरातील बहुताश क्रिया या पाण्यावर अवलंबून असल्याने पाणी योग्य प्रमाणात पिणे आणि योग्य पद्धतीने पिणे आवश्यक असते. मात्र यामध्ये काही गडबड झाली तर त्याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होऊ शकतो. पाणी पिताना आपल्यापैकी असंख्य जण काही महत्त्वाच्या चुका करतात. या चुकांमुळे शरीराला उपाय न होता अपाय होण्याचीच शक्यता अधिक असते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. हंसाजी योगेंद्र याबाबत काही महत्त्वाच्या टिप्स देतात. आता अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण सामान्यपणे पाणी पिताना करतो ते पाहूया (4 Mistakes People Do While Drinking Water)...
१. खूप गार पाणी पिणे
उन्हाळ्याच्या दिवसांत किंवा एरवीही आपण काम करुन थकलो की गार पाणी पितो. अनेकदा आपण नकळत फ्रिजकडे जातो आणि त्यातले पाणी पितो. पण असे पाणी पिणे आरोग्याच्यादृष्टीने अतिशय अपायकारक असते. यामुळे पचनाशी निगडीत समस्या निर्माण होतात. इतकेच नाही तर हे गार पाणी सामान्य तापमानाला आणण्यासाठी शरीराला बरेच कष्ट घ्यावे लागतात. त्यामुळे शक्यतो सामान्य तापमानाचे पाणी पिणे केव्हाही चांगले.
२. गटागटा पाणी पिणे
अनेकदा आपण तहान लागली की बाटलीने किंवा ग्लासने एकदम गटागटा पाणी पितो. मात्र अशाप्रकारे पाणी पिणे पोटासाठी चांगले नसते. आपली लाळ ही आम्लयुक्त असते. आपण खूप मोठमोठे घोट घेतले तर पाणी आपल्या लाळेसोबत नीट मिक्स होत नाही. यामुळे अॅसिड रिफ्लक्स आणि त्याच्याशी निगडीत इतर समस्या उद्भवण्याची समस्या असते. त्यामुळे लहान लहान घोट घेत पाणी प्यायला हवे.
३. पाणी पिताना उभे राहणे, चालणे किंवा धावणे
उभे राहून, धावताना किंवा चालताना पाणी प्यायल्यास पाणी थेट आपल्या पचनसंस्थेत जाते. त्यामुळे पाणी शरीरात नीट शोषले जात नाही. पण हेच तुम्ही नीट बसून पाणी प्यायले तर शरीराच्या सर्व भागात पाणी अतिशय चांगल्या पद्धतीने शोषले जाते आणि शरीराला त्याचा चांगला फायदा होतो.
४. जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच पाणी पिणे
अनेकदा लहान मुलं किंवा मोठी माणसंही जेवताना पाणी पितात. याचा आपल्या पचनक्रियेवर ताण येतो. तसेच मधे मधे पाणी प्यायल्याने खाल्लेले अन्न योग्य पद्धतीने पचत नाही. त्यामुळे अॅसिडीटी आणि जळजळ अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे जेवण झाल्यावर किमान अर्धा तासाने पाणी प्यायला हवे.