Join us   

4 Natural Painkiller At Home : सतत पेनकिलर खाणे जीवावर बेतायचा धोका, त्याऐवजी वापरा 4 घरगुती नॅचरल पेनकिलर, वेदना कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 2:11 PM

4 Natural Painkiller At Home : थोडं काही दुखलं की गोळ्या-औषधं घेण्यापेक्षा घरगुती गोष्टींचा वेदनाशामक म्हणून वापर केव्हाही उत्तम

ठळक मुद्दे तुळशीत दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ती आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त असते. रक्त पातळ होण्यासाठीही लवंग उपयुक्त असल्याने हृदयरोग असणाऱ्यांनी आहारात लवंगाचा वापर आवर्जून करायला हवा. 

थोडं डोकं दुखलं किंवा अंग दुखलं की घे पेनकीलर हे अनेकांसाठी सामान्य असते. डॉक्टरांकडे जाऊन उपचार करण्यापेक्षा पेनकीलर घेणे सोपे असल्याने आपल्याकडे आजही अनेक जण हाच सोपा पर्याय निवडतात. मात्र अशाप्रकारे सतत पेनकीलर घेणे आरोग्यासाठी अतिशय घातक असते. या पेनकीलरचा आपल्या अवयवांवर विपरित परीणाम होतो. याबरोबरच आपल्याला भविष्यात आरोग्याची एखादी समस्या उद्भवली तर त्यावरील औषधोपचारांना शरीर साथ न देण्यामागे पेनकीलर हे एक मुख्य कारण असते (4 Natural Painkiller At Home). पेनकीलरने आपले दुखणे तात्पुरते थांबत असले तरी त्या दुखण्याचे मूळ शोधून त्यावर योग्य ते उपचार घेणे आरोग्याच्यादृष्टीने केव्हाही चांगले. त्यामुळे औषधं घेण्यापेक्षा आपल्या स्वयंपाकघरातील कोणत्या गोष्टी आपण पेनकीलर म्हणून वापरु शकतो याविषयी...

(Image : Google)

१. हळद 

हळदीमध्ये आरोग्यासाठी उपयुक्त असणारे अनेक गुणधर्म असतात. हळदीमध्ये दाह कमी करणारे घटक असल्याने एखादे दुखणे कमी होण्यास हळदीचा चांगला उपयोग होतो. हळदीमुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होतेच त्याशिवाय रक्ताच्या गुठळ्या कमी होण्यासाठी हळद अतिशय उपयुक्त असते. हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हा घटक शरीरात जळजळ निर्माण करणाऱ्या एन्झाईम्सची पातळी कमी करण्यास उपयुक्त असतात. 

(Image : Google)

२. आलं 

आलं हाही वेदनाशमन करण्यासाठी स्वयंपाकघरात आढळणारा एक उत्तम घटक आहे. अॅसिडीटी, जळजळ, सूज, सांधेदुखी आणि इतरही अनेक उपायांसाठी आलं अतिशय उपयुक्ट ठरतं. मसाल्याचा पदार्थ म्हणून वापरला जाणारा हा पदार्थ साधारणपणे आपल्या घरात असतोच. तेव्हा कोणत्याही दुखण्यावर आल्यातील गुणधर्म जालीम उपाय ठरु शकतात. 

(Image : Google)

३. लवंग 

लवंग हाही मसाल्यातील एक महत्त्वाचा पदार्थ. काहीसा तिखट आणि पदार्थाला उत्तम स्वाद देणारी लवंग उत्तम नैसर्गिक पेनकिलर आहे. मळमळ, उलट्या यांवर लवंग तोंडात धरणे हा उत्तम उपाय असतो. अनेकदा आपल्याला प्रवासात अशाप्रकारचा त्रास होतो, त्यासाठी लवंग तोंडात धरली तर उलटी होत नाही. दातांचे दुखणे सर्वात वाईट असे म्हटले जाते. दातदुखी झाली की काही सुधरत नाही. अशावेळी लवंग तोंडात धरण्याचा चांगला फायदा होतो. याशिवाय रक्त पातळ होण्यासाठीही लवंग उपयुक्त असल्याने हृदयरोग असणाऱ्यांनी आहारात लवंगाचा वापर आवर्जून करायला हवा. 

(Image : Google)

४. तुळस 

तुळशीला धार्मिक महत्त्व असल्याने तुळस ही आपल्या घरात सहज असणारी वनस्पती. मात्र आयुर्वेदातही तुळशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे अनेक आयुर्वेदीक औषधांमध्ये तुळशीचा आवर्जून वापर केला जातो. कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन सारख्या तणाव संप्रेरकांचे नियमन करण्यासाठी तुळशीचा उपयोग होतो. तसेच तुळशीत दाहक विरोधी गुणधर्म असल्याने ती आरोग्याच्या विविध तक्रारींवर उपयुक्त असते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सहोम रेमेडी