कोलेस्टेरॉल हा आपल्या शरीरातील एक महत्त्वाचा घटक असून त्याची पातळी योग्य असणे अतिशय गरजेचे असते.यामध्ये गुड कोलेस्टेरॉल आणि बॅड कोलेस्टेरॉल असे २ घटक असतात. हे दोन्हीही योग्य प्रमाणात असले तर शरीराचे कार्य सुरळीत चालण्यास मदत होते. शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी वाढली की हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये एकप्रकारचा थर जमा होतो आणि त्यांना रक्तपुरवठा तसेच ऑक्सिजन न मिळाल्याने हृदयाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात (4 things to keep in mind to manage cholesterol levels).
कोलेस्टेरॉल ही अशी गोष्ट आहे की जी वाढली किंवा कमी झाली की समजणे अवघड असते आणि थेट हृदयविकाराचा झटका आल्यावरच आपल्याला कळते. म्हणूनच वयाच्या चाळीशीनंतर आपण स्वत:हून नियमितपणे काही तपासण्या करायला हव्यात. व्यायामाचा अभाव, चुकीची आहारपद्धती, बैठी जीवनशैली, लठ्ठपणा, ताणतणाव, धूम्रपान आणि मद्यपान यांमुळे कोलेस्टेरॉलची समस्या गेल्या काही वर्षात वाढली आहे. वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास भविष्यातील आरोग्याच्या समस्या नियंत्रणात राहू शकतात अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर आपण काहीच करु शकत नाही. कोलेस्टेरॉल नियंत्रणात राहावे यासाठी काही किमान गोष्टींची नियमित काळजी घेतल्यास त्याचा चांगला फायदा होतो. यासाठी नेमकं कोणत्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं पाहूया...
१. हृदयाला चांगले तेच खाणे
आहारात फळं, भाज्या, धान्य, प्रथिने यांचा समावेश वाढवायला हवा. हे घटक हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच तळलेले पदार्थ, सॅच्युरेटेड आणि ट्रान्स फॅटस यांचा आहारात कमीत कमी समावेश हवा.
२. ओमेगा ३ फॅटी अॅसिड
तुमचे कोलेस्टेरॉल जास्त असेल तर आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचे प्रमाण वाढवायला हवे. शाकाहारी पदार्थांपैकी जवस, आक्रोड यांमध्ये हा घटक असतो. तर माशांमध्येही ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात असते.
३. नियमित व्यायाम
व्यायाम हा एकूण आरोग्य उत्तम राहण्यासाठी महत्त्वाचा घटक असतो. आठवड्याला किमान २ तास व्यायाम अवश्य करायला हवा. यामध्ये सुरुवात करताना चालणे, जॉगिंग, सूर्यनमस्कार, स्ट्रेचिंग, सायकलिंग अशा सोप्या गोष्टींपासून सुरुवात करु शकता.
४. वजन नियंत्रणात ठेवणे
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणे अतिशय गरजेचे असते. यासाठी योग्य आहार, व्यायाम यांच्या साह्याने वजनावर नियंत्रण ठेवायला हवे. जेणेकरुन हृदयाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.