Join us   

रोज गरबा-दांडिया खेळायला गेलात तरी येणार नाही थकवा, करा ४ गोष्टी-दिवसभरही वाटेल फ्रेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 04, 2024 11:42 AM

4 Tips for improving energy level for garba and dandiya : गरबा-दांडीया खेळून थकवा-आजारपण नको तर काळजी घ्यायलाच हवी..

नवरात्र आले की तरुण मंडळींना वेध लागतात ते गरबा आणि दांडीयाचे. मोठमोठे लॉन किंवा मैदानांवर रंगणारे गरब्याचे कार्यक्रम म्हणजे तरुणांचा सळसळता उत्साह असतो. याठिकाणी सजून धजून जाताना आपल्यालाही मज्जा येते. मित्रमंडळी-बहिणभावंडं यांच्यासोबत आपल्यातील अनेक जण गरब्याचा डान्स एन्जॉय करताना दिसतात. उत्साहाच्या भरात आपण जातो खरे पण डान्सचा हा प्रकार आपल्याला आनंद देणारा असतो त्याचप्रमाणे थकवणाराही असतो (4 Tips for improving energy level for garba and dandiya).

भरजरी कपडे, मेकअप, हवेतील उष्णता आणि त्यामध्ये तासनतास दंग होऊन केला जाणारा डान्स. सुरुवातीला आपल्याला हे जाणवत नाही मात्र काही वेळानंतर आपल्याला थकवा यायला सुरुवात होते आणि अंगातील त्राण कमी होत असल्याचे जाणवते. असे होऊ नये आणि गरब्याची किंवा दांडीयांची ही संध्याकाळ आपण मनसोक्त एन्जॉय करावी यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. त्या कोणत्या पाहूया ...

१. सराव किंवा व्यायाम

वर्षभर तर आपण गरबा किंवा दांडीया खेळत नाही. त्यामुळे एकाएकी शरीराला व्यायाम झाल्यावर ते दुखणे स्वाभाविक असते. मात्र नवरात्री सुरू झाल्यापासून काही किमान स्ट्रेचिंगचे प्रकार, चालणे, सूर्यनमस्कार असे काही व्यायमप्रकार केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे गरबा-दांडीया खेळताना शरीराला थोडा ताण पडला तरी त्याचा त्रास होत नाही. 

२. पाण्याचे प्रमाण

ऑक्टोबरमध्ये हवा उष्ण असते त्यामुळे सतत घामाघूम व्हायला होते. त्यात आपण गरबा खेळलो तर आणखी घाम येतो आणि डीहायड्रेट व्हायची शक्यता असते. त्यामुळे ज्या दिवशी आपण खेळायला जाणार आहोत त्याच्या २ दिवस आधीपासून लक्षात ठेवून जास्तीत जास्त पाणी, द्रव पदार्थ घ्यावेत. शरीरातील इलेक्रोलाइटसची पातळी चांगली राहील याची काळजी घ्यायला हवी. तसेच खेळतानाही मधे मधे पाणी, सरबत, ज्यूस असे दर काही वेळाने घ्यायला हवे.

३. मन आणि शरीर फ्रेश हवे

आपण गरबा किंवा दांडीया कधी खेळायला जाणार याचे किमान प्लॅनिंग झालेले असते. त्यानुसार किमान त्या दिवशी तरी आपण जास्तीत जास्त आराम करावा. जेणेकरुन संध्याकाळी खेळताना आपण मनाने आणि शरीराने फ्रेश राहू शकतो. 

४. आहार

गरबा खेळायला गेल्यावर साधारणपणे बाहेर खाल्ले जाते. पण तसे न करता आधी आणि नंतर पूर्ण पोषण देणारा घरगुती आहार घेतला तर शरीराची ताकद टिकून राहण्यास मदत होते. यामध्ये प्रोटीन्स, जीवनसत्त्वे, खनिजे देणारा ताजा आहार असायला हवा.   

टॅग्स : शारदीय नवरात्रोत्सव २०२४नवरात्रीगरबादांडिया