Join us   

थोडी हवा बदलली की पडले आजारी, तज्ज्ञ सांगतात - इम्युनिटी वाढवण्यासाठी करा फक्त ४ गोष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2023 9:48 AM

4 Tips To Boost Immunity by Dr. Hansaji Yogesndra : मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी नियमित करायलाच हव्यात अशा गोष्टी...

कोणत्याही ऋतूमध्ये आपली प्रतिकारशक्ती चांगली ठेवायची असेल आणि बाहेरच्या वातावरणाशी जुळवून घ्यायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत काही महत्त्वाचे बदल करणे आवश्यक आहे. सकाळी उठल्यापासून दिवसभर वेगवेगळी कामं करताना आपण पार थकून जातो. पण दिवसभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फ्रेश राहायचे असेल तर आपल्या जीवनशैलीत बदल करणे आवश्यक आहे. तब्येत चांगली ठेवायची असेल तर पुरेशी झोप, व्यायाम, ताणरहित जीवन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ताजा आणि समतोल आहार या गोष्टींची आवश्यकता असते. कारण प्रतिकारशक्ती उत्तम ठेवण्यासाठी या गोष्टी आवश्यक असतात. हवामान बदलले, वातावरणात काही विषाणूंचा शिरकाव झाला की काही जण लगेच आजारी पडतात. पण काहींची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने हवा कितीही बदलली तरी त्यांची तब्येत खराब होत नाही. प्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी प्रसिद्ध योग अभ्यासक डॉ. हंसाजी योगेंद्र काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतात, त्या कोणत्या पाहूया (4 Tips To Boost Immunity by Dr. Hansaji Yogesndra)...

(Image : Google)

१. तुळशीचा काढा 

४ ते ५ तुळशीची पाने (कृष्ण तुळस), १ इंच आल्याचा तुकडा, १ चमचा गूळ किंवा खडीसाखर किंवा मध आणि १ चमचा हळद घ्यायची. एका ग्लासमध्ये कोमट पाणी घेऊन हे सगळे त्यामध्ये घालायचे. चांगले एकत्र झाले की हे पाणी प्यायचे. इम्युनिटी वाढण्यासाठी हा अतिशय उत्तम उपाय आहे. विविध प्रकारचे इन्फेक्शन्स दूर होण्यासाठी तुळस हा अतिशय सोपा उपाय आहे. 

२. शंखपुष्पी

एका बाऊलमध्ये शंखपुष्पीची पावडर घेऊन त्यामध्ये पाणी घालून हे पाणी झाकून ठेवा. अर्धा तासाने हे पाणी गाळून यात लिंबाचा रस घालून मग ते कोमट करुन प्या. हे पाणी शक्यतो झोपताना प्यायला हवे. आयुर्वेदाच्या दुकानात ही पावडर मिळते. या मध्ये फ्लॅवोनाईडस आणि अँटीऑक्सिडंटस मोठ्या प्रमाणात असल्याने ताण कमी होण्यास याची चांगली मदत होते.

३.  प्राणायाम 

हा विविध गोष्टींसाठी अतिशय उपयुक्त उपाय असून प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी याचा चांगला उपयोग होतो. भ्रामरी प्राणायम नियमित केल्यास नायट्रस ऑक्साईडची निर्मिती होण्यास मदत होते त्यामुळे ते नियमित करायला हवे. याबरोबरच अनुलोम-विलोम हाही प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक उत्तम प्राणायामाचा प्रकार आहे. 

४. डोकं शांत ठेवणे 

आपले डोके शांत असणे अनेक गोष्टींसाठी आवश्यक असते. अनेकदा आपण सोशल मीडिया आणि न्यूज पाहून पॅनिक होतो. या गोष्टींचा अनेकदा आपल्याला ताणही येतो. पण असा ताण न घेता स्ट्रेस फ्री लाईफ जगता यायला हवे. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते. सकारात्मक विचार करणे, शांत राहणे हे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे असते. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल