जेवण झालं की किंवा एरवीही आपल्याला सतत गोड खायची इच्छा होते. अशावेळी आपण चॉकलेट, पेढा, बर्फी नाहीतर आणखी काही ना काही तोंडात टाकतो. थंडीच्या दिवसांत तर गरमागरम चहा-कॉफी घेण्याला पसंती दिली जाते. गोड खाणे आरोग्यासाठी अजिबात चांगले नसते तरीही आपल्याला गोड खावेसे वाटते आणि गोडाची इच्छा आपण कंट्रोल करु शकत नाही. पण गोड खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण तर वाढतेच पण लठ्ठपणालाही आमंत्रण मिळते. त्यामुळे गोड योग्य जितके कमी खाऊ तितके चांगले. गोड खाल्ल्यानंतर आपण पुरेसा व्यायाम करत नसल्याने त्या कॅलरीज बर्न होत नाहीत आणि त्या शरीरात अनावश्यक वाढतात. याचा आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. मग गोड खाण्याची इच्छा झाल्यावर नेमकं काय करावं असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्यावरच काही सोपे उपाय आज आपण पाहणार आहोत. निधी शर्मा आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन हे उपाय शेअर करतात (4 Tips to Control Sweet cravings).
१. लिंबू पाणी
जेवण झाल्यावर किंवा मधल्या वेळात लिंबू पाणी प्यायला हवे. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा आपोआपच कमी होते. तसेच लिंबू पाण्याने बॉडी डीटॉक्स होण्यासही मदत होते. त्यामुळे गोड खाण्याच्या ऐवजी गोड न खाता लिंबू पाणी पिणे केव्हाही जास्त चांगले.
२. पिनट बटर
पिनट बटर हा प्रोटीनचा उत्तम स्त्रोत असतो. त्यामुळे गोड खाण्याची इच्छा झाल्यावर चमचाभर पिन ट बटर खाणे हा चांगला पर्याय होऊ शकतो. यामुळे पौष्टीक घटक पोटात जाण्यास मदत होते आणि गोडही खाल्ल्यासारखे वाटते.
३. फळं
साखरेचे किंवा इतर कोणते गोड पदार्थ खाण्यापेक्षा फळं खाणे केव्हाही चांगले. फळं नैसर्गिक गोड असल्याने गोड खाण्याची इच्छा झाल्यावर फळं खायला हवीत. फळांमधून आपल्याला खनिजे, व्हिटॅमिन्स असे आरोग्यासाठी आवश्यक असणारे इतर घटकही मिळत असल्याने फळं खाणे केव्हाही जास्त चांगले.
४. प्राणायाम
गोड खावेसे वाटल्यावर प्राणायाम करायला हवे. त्यामुळेही गोड खाण्याची इच्छा आपोआप कमी होऊ शकते. प्राणायाम आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठीही चांगला असल्याने प्राणायाम अवश्य करायला हवा.