लघवी लागणे ही अतिशय सामान्य नैसर्गिक क्रिया आहे. लघवी लागल्यावर ती दाबून न ठेवता वेळच्या वेळी करणे उत्तम आरोग्यासाठी अतिशय महत्त्वाचे असते. बऱ्याचदा महिला बाहेर गेल्यावर लघवी लागेल म्हणून कमी पाणी पितात. प्रवासात लघवी लागू नये म्हणून काही जणी पाणी पिणेच टाळतात. पण असे करणे आरोग्यासाठी घातक असते. घरात असल्यावर आपण साहजिकच लघवीला जाण्यासाठी घरातील टॉयलेटचा वापर करतो. हे टॉयलेट आपण केवळ कुटुंबातील व्यक्तीच वापरत असतो. इतकेच नाही तर ते आपण वेळच्या वेळी साफही करत असतो. पण ऑफीस, हॉटेल, मॉल अशा ठिकाणी गेल्यावर आपल्याला लघवी लागली तर आपल्याला त्या ठिकाणचे टॉयलेट वापरण्याशिवाय पर्याय नसतो. बरेच जण वापरत असलेले सार्वजनिक टॉयलेट वापरल्याने आपल्याला युरीन इन्फेक्शन होण्याची शक्यता असते (4 Tips to take care while using public toilet).
इन्फेक्शन होण्याचे कारण काय?
मॉल, चित्रपटगृह, हॉटेल किंवा आणि बऱ्याच ठिकाणी साधारणपणे वेस्टर्न टॉयलेट असते. वेस्टर्न टॉयलेटमुळे संसर्ग होण्याचा धोका जास्त असतो. मात्र लघवी लागल्यावर शौचालयाचा वापर करण्याशिवाय पर्याय नसतो. अशावेळी काही गोष्टींची योग्य ती काळजी घेऊन या टॉयलेटचा वापर करायला हवा. आरोग्याला धोका उद्भवू नये म्हणून नेमकं काय करायचं ते आज आपण समजून घेणार आहोत.
सार्वजनिक टॉयलेट वापरताना काय काळजी घ्यावी?
१. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे वेस्टर्न टॉयलेट वापरताना टॉयलेट सीट टिश्यू पेपरने स्वच्छ पुसून घ्यावे. बरेच जण या टॉयलेट सीटचा दिवसभर वापर करत असतात. त्यामुळे इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे सीट बसण्याआधी पुसून घ्यावे. टिश्यू पेपर नसेल तर पाणी फ्लश करुनही आपण हे सीट स्वच्छ करु शकतो.
२. टॉयलेट सॅनिटायझर ही सार्वजनिक टॉयलेटचा वापर करताना आवश्यक असलेली आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या पर्समध्ये हँड सॅनिटायझर असतेच, ते कॅरी करणेही सोपे असते. हे सॅनिटायझर सीटवर मारुन सीट निर्जंतूक करता येते. यामुळे युरीन इन्फेक्शनपासून आपण नक्कीच दूर राहू शकतो.
३. बाजारात वेस्टर्न सीटवर वापरण्यासाठीचे युज अँड थ्रोचे प्लास्टीक किंवा कापडी कव्हर्स मिळतात. तुम्ही बाहेर जाणार असाल त्यावेळी अशाप्रकारचे कव्हर्स तुम्ही सोबत कॅरी करु शकता. हे कव्हर्स वापरायला आणि कॅरी करायलाही सोपे असल्याने हा पर्यायही सोपा आहे.
४. पेपर सोपचा वापर करणे हा सार्वजनिक टॉयलेटच्या स्वच्छतेतील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. येथील साबण न वापरता हे कागदी साबण वापरले तर ते वापरुन फेकून देता येतात. ते कॅरी करणेही सोपे असल्याने हा उपाय इन्फेक्शन टाळण्यासाठी उपयुक्त ठरु शकतो.