Join us   

आपण नेहमी वापरतो ती ४ उत्पादने आरोग्यासाठी घातक; वेळीच लक्ष द्या, नाहीतर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 12:14 PM

4 Toxic Female Products that harm your health : आपण दुर्लक्ष करत असलेल्या गोष्टींचा बारकाईने विचार करायला हवा...

आपण आवरताना आणि घराबाहेर जाताना चेहऱ्यावर लावण्यासाठी किंवा आणखीही काही ना काही उत्पादने वापरत असतो. सौंदर्यप्रसाधने तयार करणाऱ्या कंपन्या दिवसागणिक नवनवीन उत्पादने तयार करत असल्या तरी आपल्या आरोग्यासाठी हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने आवर्जून विचार करायला हवा. महिलावर्गात सौंदर्यप्रसाधने वापरण्याचे प्रमाण तुलनेने जास्त असते. मात्र ही उत्पादने महिलांच्या आरोग्यासाठी घातक असतात हे वेळीच लक्षात घ्यायला हवे. अन्यथा आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात आणि मग त्यावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला काही केल्या समजत नाही. म्हणूनच आरोग्यासाठी घातक अशी ४ उत्पादने कोणती ते पाहूया आणि त्यापासून दूर राहण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करुया (4 Toxic Female Products that harm your health)...

१. डीओड्रंट्स

अंगाला घामाचा वास येऊ नये म्हणून आपण अगदी सर्रास अंगावर डीओड्रंट मारतो. मात्र टीव्हीवर डीओड्रंटची जाहिरात करणाऱ्या कंपन्या त्यामध्ये किती प्रमाणात आणि कोणती केमिकल्स वापरलेली आहेत हे मात्र सांगत नाहीत. पण या केमिकल्सचा आपल्या शरीरावर विपरीत परीणाम होतो आणि त्यामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. डीओड्रंटमुळे आपल्या घाम बाहेर येण्याच्या ग्रंथी ब्लॉक होतात आणि त्यामुळे बॉडी डीटॉक्स होत नाही. तसेच डीओड्रंटमधील केमिकल्स वासाच्या माध्यमातून फुफ्फुसात जातात आणि ते आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे डीओड्रंटपेक्षा इसेन्शिअल ऑईल वापरलेले केव्हाही जास्त चांगले. 

२. सॅनिटरी पॅड

बहुतांश मुली आणि महिला मासिक पाळीमध्ये सॅनिटरी पॅडसचा वापर करतात. डीस्पोझेबल पॅडस वापरण्यासाठी सोयीचे असले तरी त्यामध्ये असणारे केमिकल्स आणि सुगंध आरोग्यासाठी चांगले नसतात. आपण महिन्यातील ४ ते ५ दिवस हे पॅड आपल्या शरीराच्या अतिशय नाजूक भागासाठी वापरतो ज्यामुळे हे केमिकल्सचा आपल्या शरीराशी खूप जवळून संबंध येतो. प्रजनन क्षमतेवर याचा परीणाम होतो आणि काही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. कापडी पॅडस किंवा मेनस्ट्रूअल कप हा अतिशय सोपा आणि उत्तम पर्याय असून याचा आवर्जून वापर करायला हवा. 

३. इंटीमेट वॉशेस

काही कंपन्या महिलांसाठी प्रायव्हेट पार्ट साफ राहण्यासाठी काही केमिकल्सची विकतात. अशी केमिकल्स महिला मोठ्या प्रमाणात विकतही घेतात. मात्र अशाप्रकारच्या कोणत्याही केमिकलने वॉश घेण्याची आवश्यकता नसते. याचे विपरीत परीणाम होण्याची शक्यता असल्याने अशाप्रकारचा वॉश घेणे टाळायला हवे.

४. नेलपेंट

आपण नखं सुंदर दिसावीत म्हणून अनेकदा नेलपेंट लावतो. पण या नेलपेंटमध्ये असणारे केमिकल्स जेवताना नकळत आपल्या अन्नपदार्थांमध्ये जातात आणि त्याचा आपल्या शरीरावर वाईट परीणाम होतो. त्यामुळे अगदीच पर्याय नसेल तरच तेवढ्या वेळापुरते नेलपेंट लावावे अन्यथा त्याची काहीच आवश्यकता नसते. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल