आपलं मूल धष्टपुष्ट आणि जा़जूड असावं अशी पालक म्हणून प्रत्येकाची इच्छा असते. मुलांचे वय वाढते तशा त्यांच्या अॅक्टीव्हीटीज वाढत जातात आणि खाण्याकडचे लक्ष कमी होत जाते. अशावेळी मुलांचे नीट पोषण न होण्याचीच शक्यता जास्त असते. मात्र वाढीच्या वयात मुलांचे शारीरिक पोषण योग्य पद्धतीने होणे अतिशय आवश्यक असल्याने त्यांचा आहार अतिशय चांगला असणे गरजेचे असते. पालकांची चण लहान असेल तर मुलाची चण लहान असणे ठिक आहे. पण मूल सतत आजारी पडत असेल, त्याची प्रतिकारशक्ती कमी असेल किंवा वजन प्रमाणापेक्षा कमी असेल तर मात्र पालकांनी या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे (4 Weight gain foods for weak child).
मुलांच्या आहारातून त्यांना पुरेशी पोषणमूल्ये मिळत नसतील तर या तक्रारी भेडसावतात. लहान वयात त्यांचे नीट पोषण झाले नाही तर शरीराची आणि मेंदूची पुरेशी वाढ होत नाही. त्यामुळे मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक क्षमता विकसित होत नाहीत. याचा मुलांच्या वाढीवर परीणाम होतो. म्हणूनच मुलांना प्रथिने, कार्बोदके, जीवनसत्त्वे, खनिजे देणारे सर्व घटक त्यांच्या आहारात असतील याची पालकांनी जास्तीत जास्त काळजी घ्यायला हवी. यासाठी मुलांचा आहार सकस आणि पूरक असेल यासाठी आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा पाहूया..
१. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
दूध आणि दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर आहारात दूध आणि पनीर, चीज, दही, ताक यांसारख्या पदार्थांचा अवश्य समावेश असायला हवा. दूधामध्ये असणारे फॅटस, कॅल्शियम, व्हिटॅमिन्स यांमुळे हाडांचे आणि एकूण आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
२. सुकामेवा
सुकामेव्यामध्ये व्हिटॅमिन्स, प्रोटीन्स, मॅग्नेशियम, हेल्दी फॅटस, स्निग्धता यांसारखे घटक अतिशय मुबलक प्रमाणात असतात. उत्तम आरोग्यासाठी हे सगळे घटक आवश्यक असतात. त्यामुळे मुलांना स्नॅक टाइममध्ये खाण्यासाठी सुकामेवा अवश्य द्यायला हवा. आक्रोड, काजू, बदाम, पिस्ता, सुकं अंजीर , मनुके हे घटक मुलांना शेक, स्मूदी, लाडू अशा कोणत्या ना कोणत्या स्वरुपात द्यायला हवेत.
३. केळी
मुलांचे वजन कमी असेल तर केळ्याने वजन वाढण्यास मदत होते. केळ्यामध्ये फॅटस, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, ई, के हे घटक चांगल्या प्रमाणात असतात. तसेच यामध्ये असणारे ओमेगा ३ फॅटी अॅसिड मुलांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. म्हणूनच वजन कमी असेल तर मुलांना रोज १ केळे अवश्य द्यावे.
४. भाज्या
भाज्यांमधून मुलांना विविध प्रकारची खनिजे आणि व्हिटॅमिन्स मिळण्यास मदत होते. त्यामुळे पालेभाज्यांबरोबरच विविध रंगाच्या, चवीच्या भाज्या मुलांच्या आहारात जास्तीत जास्त प्रमाणात असतील याचा प्रयत्न करायला हवा. मुलं अनेकदा भाज्या खाण्यास नखरे करतात अशावेळी पराठा, कटलेट, आप्पे, फ्रँकी अशा पदार्थांमधून भाज्या मुलांच्या पोटात जातील असे पाहावे.