Join us   

रोज 45 मिनिटे व्यायाम, टाळतो कॅन्सरचा धोका! पण एकाच जागी बसून राहिलात तर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2021 6:48 PM

शरीर निष्क्रियतेचे गंभीर परिणाम अभ्यासातून समोर आले आहे. नुकताच अमेरिकेत शरीर निष्क्रियता आणि आरोग्यास धोका याबाबतचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास सांगतो शरीराची हालचाल पुरेशी नसेल तर त्याचे शरीरावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. शरीराची पुरेशी हालचाल नसल्याने कॅन्सरचा धोका वाढतो.

ठळक मुद्दे  कॅन्सरचा धोका केवळ रोज ४५ मिनिटांच्य व्यायामाने टाळता येतो असं हा अभ्यास सांगतो.शारीरिक व्यायामानं आपली रोग प्रतिकारकशक्ती वाढते. रोगप्रतिकारकशक्तीचा आणि व्यायामाचा घनिष्ठ संबंध आहे.आपल्या शरीराच्या आतील यंत्रणा व्यवस्थित चालत असल्या की कॅन्सरचा धोका कमी होतो.

एका जागी बसून काम करण्यात अनेकांना सुख वाटतं. कोरोनामुळे तर हे सुख लोकांनी वर्क फ्रॉम होम करुन, तासनतास एका जागेवर बैठक मारुन पुरेपूर अनुभवलं. पण हे बसण्याचं सुख मात्र खूपच महागात पडतं असं तज्ज्ञ आणि अभ्यासक म्हणतात. गेल्या दिड वर्षांपासून कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे  बाहेर जाण्यावर, मोकळेपणानं फिरण्यावर अनेक बंधनं आली. रोजच्या कामापुरती थोडं बाहेर पडायचं आणि घरी येऊन पुन्हा कम्प्युटरसमोर समाधी लावायची अशी अनेकांची जीवनशैली झाली. यात स्त्री -पुरुष या सगळ्यांचाच समावेश आहे.

Image: Google

आधीच आधुनिक जीवनशैलीने माणसाला तास न तास एका जागी बसवून ठेवलं त्यात कोरोनाची भर. त्यामुळे या बैठ्या जीवनशैलीत आणखीनच वाढ झाली. त्याचा परिणाम म्हणजे शरीराची हालचाल पुरेशी होत नाही. शरीर निष्क्रियतेचे गंभीर परिणाम अभ्यासातून समोर आले आहे. नुकताच अमेरिकेत शरीर निष्क्रियता आणि आरोग्यास धोका याबाबतचा अभ्यास करण्यात आला. हा अभ्यास सांगतो शरीराची हालचाल पुरेशी नसेल तर त्याचे शरीरावर आणि आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. उलट आपण भरपूर सक्रिय असलो, शरीराची भरपूर हालचाल केली तर अनेक रोगांपासून आपण स्वत:चा बचाव करु शकतो. हा अभ्यास सांगतो , रोज कमीत कमी ४५ मिनिटांचा व्यायाम केला तर कॅन्सरचा धोका कमी होतो. अभ्यासण्यात आलेल्या कॅन्सरच्या रुग्णांपैकी ३ टक्के रुग्ण केवळ शारीरिक निष्क्रियतेमुळे या आजाराला सामोरे जात आहेत. हा अभ्यास ‘मेडिसिन अ‍ॅण्ड सायन्स इन स्पोर्टस अ‍ॅण्ड एक्सरसाइज जर्नल’मधे प्रकाशित करण्यात आला आहे.

Image: Google

काय सांगतो हा अभ्यास?

हा अभ्यास म्हणतो की , संपूर्ण जगभरात बैठ्या जीवनशैलीमूळे कॅन्सरचा धोका आणि रुग्ण दोन्ही वाढत आहेत. इतर कूठला व्यायाम नाही जमला तरी किमान ४५ मिनिटं पायी चालण्यामुळेही शरीराची चांगली हालचाल होते आणि कॅन्सरचा धोका केवळ रोज ४५ मिनिटांच्या  व्यायामाने टाळता येतो असं हा अभ्यास सांगतो. हा अमेरिकेतील सर्व राज्यांमधे ६ लाख लोकांवर ज्यात कॅन्सर संशयित रुग्ण आणि ज्यांची शारीरिक हालचाल अजिबात नाही त्यांचा अभ्यास करण्यात आला. यात स्त्री पुरुष या दोघांचाही समावेश होता. यातूनच शारीरिक निष्क्रियता कॅन्सरला कारणीभूत ठरत असल्याचं आढळून आलं.

Image: Google

डॉक्टर काय म्हणतात?

या अभ्यासाच्या निष्कर्षाला आपल्या भारतीय डॉक्टरांनी देखील दुजोरा दिला आहे. नोएडा येथील डॉ. नीता राधाकृष्णन म्हणतात की , हा अभ्यास आता झाला असला तरी या आधीच्या अभ्यासांनी हेच सांगितलं होतं की जेवढी शरीराची हालचाल कराल तेवढे कॅन्सरला स्वस्त:पासून दूर लोटाल. व्यायाम आणि कॅन्सर यांच्यातला संबंध सांगतांना त्या म्हणतात की, शारीरिक व्यायामानं आपली रोग प्रतिकारशक्ती वाढते. आपल्या शरीरात सीसीटीव्ही सारखे ट्यूमरवर नजर ठेवणारी यंत्रणा असते. जेव्हा आपल्या शरीरात कॅन्सरच्या पेशी वाढतात तेव्हा ही यंत्रणा अयशस्वी झालेली असते.  का झालं असं? -  कारण या यंत्रणेला शारीरिक हालचालीतून जी ऊर्जा आणि बळ हवं होतं ते मिळालंच नाही. डॉ. नीता म्हणतात की , स्तनाचा, कोलन, आतड्यांचा कॅन्सर यांचा थेट संबंध आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीशी असतो. आणि रोगप्रतिकारकशक्तीचा संबंध हा थेट व्यायामाशी असतो. जेव्हा आपण पुरेसा व्यायाम करतो तेव्हा आपल्या संपूर्ण आरोग्यावर प्रभाव टाकणारी पचनसंस्था व्यवस्थित काम करते. इतकंच नाही तर व्यायामानं संपूर्ण शरीराचीच यंत्रणा सुरळित चालते. आपल्या शरीराच्या आतील यंत्रणा व्यवस्थित चालत असल्या की कॅन्सरचा धोका कमी होतो. आताचं आपलं जगणं हे कामानं वेढलेलं आहे. आपण २४ तास कामात व्यग्र असतो. पण या कामानं मानसिक थकवा येतो. या थकव्यातून बाहेर पडून पुन्हा ऊर्जा क मावयची असेल तर शरीर सक्रीय असणं, शरीराची हालचाल होत राहाणं आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यायाम या अतिशय सोप्या गोष्टीनं कॅन्सरचा धोका कमी होणार असेल तर व्यायामाला प्रत्येकानं गांभिर्यानं घ्यायला हवं !