Join us   

ॲसिडीटीने छळलंय? वैताग आलाय? तज्ज्ञ सांगतात, आहारात हवे ५ पदार्थ- ॲसिडीटी होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2022 12:30 PM

5 Acidity Regulating Foods Diet Tips for Acidity : आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा अॅसिडीटी दूर करण्यासाठी आहारात असायलाच हवे असे पदार्थ सांगतात

ठळक मुद्दे अॅसिडीटी ही अनेकांना भेडसावणारी एक महत्त्वाची समस्या असून त्यावर वेळीच उपाय करायला हवा.उत्तम आहार हा अनेक गोष्टींसाठी महत्त्वाचा असून त्याकडे नीट लक्ष द्यायला हवे

अॅसिडीटी होते म्हणजे नेमके काय होते याची आपल्याला नेमकी व्याख्या सांगता येणार नाही. पण अॅसिडीटी म्हणजे काय हे ज्यांना होते त्यांनाच कळते. छातीत होणारी जळजळ, मळमळ आणि त्यानंतर डोकेदुखी, उलट्या हा सगळा त्रास असह्य असतो. अनेकदा जीवनशैलीतील चुकीच्या गोष्टींमुळे अॅसिडीटी होत असल्याचे आपल्याला दिसते. यामध्ये प्रामुख्याने आहार, अपुरी झोप, ताणतणाव, अपचन, व्यायामाचा अभाव यांसारख्या तक्रारींमुळे अॅसिडीटी होते. अनेकांची प्रकृतीच अॅसिडीक असल्यानेही सगळं व्यवस्थित असूनही ही अॅसिडीटी सतावते. मग घरगुती उपायांनी किंवा औषधांनी ही अॅसिडीटी शमवण्याचा प्रयत्न केला जातो. पण आहारात काही गोष्टींचा समावेश केल्यास अॅसि़डीटी मुळापासून दूर होण्यास मदत होते. प्रसिद्ध आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा अॅसिडीटी दूर करण्यासाठी आहारात असायलाच हवे असे पदार्थ सांगतात ते कोणते पाहूया (5 Acidity Regulating Foods Diet Tips for Acidity)...

(Image : Google)

१. भात 

भात पचायला हलका असतो आणि त्यामध्ये असणारे घटक शरीरातील आम्ल नियंत्रणात ठेवण्यासाठीही अतिशय उपयुक्त त्यामुळे भाताचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा.

२. केळं 

केळ्यामध्ये पोटॅशिअम बऱ्याच प्रमाणात असल्याने आम्ल नियंत्रणात ठेवण्याची प्रक्रिया चांगली होते. तसेच केळ्यामुळे पोट साफ होण्यासही मदत होत असल्याने आणि केळं सहज सर्वत्र उपलब्ध असणारे फळ असल्याने ज्यांना अॅसिडीटीचा त्रास आहे अशआंनी केळं नियमित खायला हवं.

३. सब्जा

सब्जा शरीराला शांत करण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी उपयुक्त असतो. त्यामुळे दूध किंवा पाण्यातून सब्जा बी घेतल्यास उष्णता आणि अॅसिडीटी नियंत्रणात राहण्यास मदत होते. 

४. कंदमुळे 

कंदमुळांमध्ये स्टार्चचे प्रमाण चांगले असते. मात्र या पदार्थांमध्ये जास्त तेल किंवा मसाले वापरल्यास ते आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे बटाटा, रताळी, बीट, गाजर यांचा आहारात समावेश वाढवावा.

५. काकडी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. तसेच अॅसिडीटी कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर असल्याने काकडीचा आहारात आवर्जून समावेश करायला हवा. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सलाइफस्टाइल