Join us   

5 चुकीच्या सवयींमुळे सुटतं पोट! आधी आपल्या सवयी बदला, पोट सुटायची चिंता विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2022 2:17 PM

सुटलेल्या पोटाची चिंता वाटते? आधी आपल्या सवयी तपासा.. 5 चुकीच्या सवयींमुळे सुटतं पोट

ठळक मुद्दे आरोग्यास धोका निर्माण करणारी पोटावरची चरबी आपल्या काही चुकांमुळेही वाढते. पोट वाढतं आहे हे लक्षात आल्यास आधी आपल्या सवयी तपासून पाहाव्यात!

पोट सुटणं म्हणजे केवळ पोटावरची चरबी वाढणं किंवा पोटावरच्या त्वचेखालचा स्तर वाढणं नव्हे. पोट सुटण्याकडे गांभीर्यानं पाहायला हवं असं तज्ज्ञ म्हणतात. पोटावरची चरबी वाढणं म्हणजे 'व्हिसरल फॅटही असू शकतं. व्हिसरल फॅट म्हणजे  आपल्या महत्वाच्या अवयवांच्या भोवतालच्या यकृत, ह्दय, स्वादुपिंड, मूत्रपिंडाभोवती साठून राहिलेले फॅट्स. यामुळे स्वादुपिंडाची क्रिया बिघडते. यकृताला साखर पुरवण्याची ताकद कमी होते. वाढलेल्या पोटामागे आरोग्याशी निगडित संभाव्य धोकेही लपलेले असतात.

Image: Google

कमी पोट, कमरेचा कमी घेर म्हणजे दीर्घ आयुष्य असं म्हटलं जातं. पोट सुटल्यानं, पोटावरची चरबी वाढल्यानं हदयरोग, टाइप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेराॅलच्या आणि श्वसनाच्या समस्या निर्माण होतात. ज्यांचं वजन कमी पण पोट जास्त त्यांनी केवळ वजन कमी भरल्यानं बिनधास्त राहू नये. वाढलेलं पोट हे वर म्हटल्याप्रमाणे व्हिसरल फॅट असू शकतं. त्यामुळे रक्तवाहिन्यांशी निगडित आजार होण्याचा धोका असतो. कमरेचा घेर हा 35 इंच अर्थात 89 सेंटीमीटर पेक्षा जास्त असणं हे धोकादायक मानलं जातंं. आरोग्यास धोका निर्माण करणारी पोटावरची चरबी आपल्या काही चुकांमुळेही वाढते. पोट वाढतं आहे हे लक्षात आल्यास आधी आपल्या सवयी तपासून पाहाव्यात!

Image: Google

का वाढतं पोट?

1. खाताना खाण्याकडे लक्ष नसणं या सवयीमुळे वजनाचं गणित बिघडतं. नाश्ता किंवा जेवण करताना मोबाइल पाहाणं, टी.व्ही पाहाणं यामुळे खाण्यावरचं लक्ष विचलित होतं. लक्ष न देता खाल्ल्यानं आपण किती आणि काय खातोय याकडे लक्ष राहात नाही. तज्ज्ञ म्हणतात खाताना सजगतेनं खायला हवं. जितकं लक्ष देऊन खाल तेवढं कमी खालं. जेवताना खाण्याकडे लक्ष दिल्यास, घास पुरेसा चावून खाल्ल्यास पोट वाढण्याचा धोका टळतो.

2. आपलं पोट भरलं आहे संदेश पोटाकडून मेंदूपर्यंत जायला किमान 20 मिनिट लागतात. त्यामुळे जेवणासाठी वेळ काढताना तो 20 मिनिटांहून अधिक असावा. भराभर खाल्ल्यास आवडीचे पदार्थ जास्त खाल्ले जाण्याचा धोका असतो. यामुळे वजन आणि पोट वाढण्याचा धोका असतो. तो टाळण्यासाठी लक्ष देऊन, पुरेसा वेळ देऊन जेवायला हवं. शांत चित्तानं, सावकाश खाल्ल्यास शरीरात अन्नाद्वारे गरजेपेक्षा जास्त कॅलरीज जात नाही. 

3. झोपेच्या सवयींचाही पोटाच्या घेरावर परिणाम होतो. याबाबत झालेला अभ्यास सांगतो की, 40 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्ती 5 तासांपेक्षाही कमी झोपतात त्यांचं पोट पुरेशी झोप घेतलेल्यांच्या तुलनेत मोठं असतं. तसेच 8 तासांपेक्षाही जास्त झोप घेणऱ्यांचा पोटाचा घेर वाढण्याची शक्यता असते. जास्त झोपल्यामुळे पोटातील आतड्यांचा विस्तार होवून पोट सुटतं.

Image: Google

4. आपण काय खातो या प्रश्नाइतकाच आपण कधी हातो हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असल्याचं तज्ज्ञ सांगतात. उशिरा जेवण करणं ही वजन आणि आरोग्याचा विचार करता चुकीची सवय आहे. उशिरा जेवल्यानं पचन व्यवस्थेला अन्न पचवायला वेळ आणि श्रम जास्त पडतात. रात्री उशिरा जेवल्यानं शरीरात निर्माण घोणारे उष्मांक शरीराची कमी हालचाल केल्यानं वापरले जात नाही. उशिरा जेवल्यानं गरजेपेक्षा जास्त कॅलरीज शरीरात जातात, साठतात आणि त्यांचं चरबीत रुपांतर होतं.

5. प्रोसेस्ड फ्रूड अर्थात प्रक्रिया केलेले पदार्थ जर जास्त प्रमाणात खाल्ले गेल्ले तर पोटाची चरबी वाढते. प्रोसेस्ड फूडमुळे हळूहळू पचणारे फायबर नष्ट होतात. पोसेस्ड फूड लवकर पचतं आणि रक्तातील साखर वाढवतंं. आपलं पोट वाढत असल्यास म्हणूनच आपख्या खाण्या पिण्याच्या आणी आहारच्या सवयी तपासून पाहाण्याचा, त्या चुकीच्या असतील त्यात दुरुस्ती करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. 

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सआहार योजना