Join us   

थंडीत सीताफळ खाण्याचे ५ फायदे, अस्थमासह अनेक आजरांवर गुणकारी फळ, वाचा त्याचे उपयोग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2022 1:49 PM

Custard Apple Health Benefits सीताफळ डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासह अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फळ किफायतशीर आहे

सीताफळ या फळामध्ये अनेक गुणधर्म आहेत. हे फळ मुळचे वेस्ट इंडीज बेटे व दक्षिण अमेरिकेचे आहे. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करता येते. बदलत्या ऋतूनुसार अनेक फळे बाजरात दाखल होतात. त्यानुसार फळांचे सेवन केले पाहिजे. सीताफळ खाण्यासाठी चविष्ट लागते. सीताफळात कॅल्शिअम, लोह, थायमीन, रिबोफ्लेविन, नियासिन, ‘क’ जीवनसत्त्व व ‘बी वन’ व ‘बी टू’ जीवनसत्त्व आढळतात. तसेच त्यात आर्द्रता, प्रथिने, मेद, तंतुमय, पिष्टमय पदार्थ व नैसर्गिक फलशर्कराही भरपूर प्रमाणात असते. आयुर्वेदानुसार सीताफळ हे शीत, मधुर रसाचे, पित्तशामक, कफकारक व तृषाशामक आहे. तसेच हृदय, रक्तवर्धक, बलवर्धक, मासवर्धक, वातशामक आणि तृप्तीदायकही आहे. हे फळ डायबिटीज नियंत्रित ठेवण्यास मदत करते. यासह अस्थमा असलेल्या रुग्णांसाठी देखील हे फळ किफायतशीर आहे.

डॉ. एलिन कैनडी, हे सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या पोषण आणि आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार,’’सीताफळ याला 'गुड मूड' म्हणूनही ओळखले जाते. या हंगामी फळामध्ये फायबर, व्हिटॅमिन-बी6, अँटी-डायबेटिक आणि अँटी-बायोटिक गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त ठरतात. या फळाचे सेवन केल्याने अनेक आजार लवकर बरे होतात.”

सीताफळ खाण्याचे फायदे

डायबिटीक रुग्णांसाठी फायदेशीर

सीताफळ या फळात अनेक गुणधर्म आहेत, जे मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मदत करते. डॉ. एलिन कैनडी यांनी सांगितले, “मधुमेहाच्या रुग्णांसाठी सीताफळ खाणे खूप फायदेशीर आहे. कारण त्यात अँटी-डायबेटिक गुणधर्म असतात. सीताफळ रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण स्थिर ठेवते. यासोबतच मधुमेहामुळे होणारे विविध धोके रोखण्यासाठी ते प्रभावीपणे काम करते. सीताफळ मधुमेहाची लक्षणे काही प्रमाणात कमी करू शकते, परंतु मधुमेहावर उपचार नाही. चांगल्या उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.”

वजन वाढण्यास मदत

जर आपण आपल्या कमी वजनामुळे त्रस्त असाल तर सीताफळ तुम्हाला मदत करू शकेल. खरं तर, कमी वजन असण्याचं एक प्रमुख कारण म्हणजे शरीरातील आवश्यकतेपेक्षा जास्त ऊर्जा खर्च होणे. सीताफळ हा ऊर्जेचा उत्तम स्रोत मानला जातो, ज्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.त्यामुळे सीताफळाच्या ऋतूत याचे सेवन केल्यास आपल्या शरीराला खूप फायदेशीर ठरेल.

एंटी-इंफ्लेमेटरी गुण अस्थमापासुन देईल आराम

अस्थमाची समस्या मुख्य इन्फ्लेमेशन पासून सुरु होते. ज्यामध्ये फुफुसाच्या आतील बाजूस सुज येते. त्यामुळे अनेकांना श्वास घेण्यास त्रास होतो. सीताफळमध्ये अधिक प्रमाणावर एंटी-इंफ्लेमेटरी गुण आहेत. जे अस्थमापासून आराम देण्यास मदत करेल. एका संशोधनेनुसार, एंटी-इंफ्लेमेटरी क्रिया अस्थमा कमी करण्यास मदत करते. ज्यामुळे अस्थमापासून काही काळ आराम मिळतो .

हृदयविकाराचा धोका कमी

सीताफळ हे व्हिटॅमिन-बी6 चा चांगला स्रोत मानला जातो. व्हिटॅमिन-B6 चे सेवन हृदयविकाराचा धोका लक्षणीयरीत्या कमी करू शकतो. त्यामुळे सीताफळ याचे सेवन आपल्या हृदयासाठी खूप लाभदायक आहे.

निरोगी पचनासाठी फायदेशीर

पचनक्रिया सुधारण्यासाठी सीताफळ फायदेशीर ठरू शकते. निरोगी पचनासाठी फायबरची गरज असते. सीताफळात भरपूर फायबर असते. पचनक्रिया सुधारण्यासोबतच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासूनही आराम मिळतो.

रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी

सीताफळात मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आढळून येते. जर एखाद्या व्यक्तीला उच्च रक्तदाबाची समस्या असेल तर सीताफळमध्ये समाविष्ट असलेल्या कॅल्शियम आणि मॅग्नेशियमच्या सेवनाने काही प्रमाणात तो नियंत्रित केला जाऊ शकतो. सीताफळाचे सेवन केल्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकारसंबंधित धोकाही कमी होतो.

टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्सफळेमधुमेह