आपल्या पोटाचं आरोग्य चांगलं असेल तर आपलं आरोग्य चांगलं असतं असं म्हणतात. आरोग्याच्या बहुतांश तक्रारी या पोटातून सुरू होतात. त्यामुळे पोटाचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आपला आहार, झोप, व्यायाम आणि ताणतणावांचे नियोजन या गोष्टी नीट असायला हव्यात. यातही आहाराबाबत काही पथ्य पाळल्यास त्याचा आरोग्याला अतिशय चांगला फायदा होतो. आयुर्वेदीक डॉक्टर असलेल्या डींपल जडेजा यासाठीच काही महत्त्वाच्या टिप्स शेअर करतात. आहाराबाबत ५ गोष्टी लक्षात ठेवून त्या किमान ७ दिवस फॉलो केल्यास त्याचा आरोग्याला कसा फायदा होतो ते पाहा (5 Diet Tips To Boost Your Gut Health).
१. फळं खाताना
फळं खाणं आरोग्यासाठी अतिशय चांगलं असतं म्हणून आपण फळांचा आहारात समावेस करतो. मात्र ती खाताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात. फळं ज्यूस न करता कच्ची खायला हवीत. कोणतंही फळ खाण्याच्या आधी २ तास आणि नंतर १ तास गॅप असायला हवी. फळांमधले एन्झाइम्स पोटातल्या बॅक्टेरीयांसाठी अतिशय फायदेशीर असतात. इतकंच नाही तर मानसिक आणि भावनिक गोष्टींसाठीही ते फायद्याचे असतात. सूर्यास्तानंतर फळं कधीच खाऊ नका, त्याचा झोपेवर विपरीत परीणाम होतो.
२. पालेभाज्या आणि फळभाज्या
भाज्या खूप कच्च्या खाऊ नका आणि खूप जास्त शिजवून त्याची स्मूदी करुनही खाऊ नका. त्यापेक्षा त्या योग्य प्रमाणात शिजवा आणि रात्रीच्या वेळी पालेभाज्यांचे सूप करुन प्या. यामुळे पोटाचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
३. धान्य, डाळी, बिया, दाणे
या सगळ्या गोष्टी खाण्याच्या आधी किमान १ तास पाण्यात भिजवून ठेवा. यामुळे त्याच्या वर असलेला अनावश्यक लेअर निघून जाण्यास मदत होईल आणि पचनक्रियाही सुरळीत होण्यास मदत होईल.
४. मसाले
मसाले आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. त्यामुळे त्याचा योग्य प्रमाणात वापर केल्यास आरोग्याला चांगला उपयोग होतो. जिरे, बडीशेप, धणे, वेलची, लवंग, दालचिनी, सुंठ पावडर, काळी मिरी, तमालपत्र या सगळ्याचा स्वयंपाकात वापर करा ज्यामुळे पोटाच्या समस्या दूर होण्यास मदत होईल.
५. इंटरमिटंट फास्टींग
शक्यतो सूर्यास्तानंतर काहीही खाऊ नका. तसंच अन्नपदार्थ आणि इतर द्रव्य पदार्थ यांच्यात १२ ते १४ तासांचा गॅप असायला हवा. या ब्रेकमध्ये तुम्ही पाणी पिऊ शकता.