Join us   

सकाळी झोपेतून उठताच चहा पिण्याचे 5 तोटे, मात्र चहाशिवाय कशी येणार तरतरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 02, 2022 3:42 PM

सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात हे समजून घेऊया...

ठळक मुद्दे उठल्या उठल्या चहा पिण्यापेक्षा दूध प्या, फळं खा, सुकामेवा खाअनेक वर्ष चहा पिण्याची सवय असेल तरी ती आरोग्यासाठी ठरु शकते घातक

सकाळी झोपेतून उठल्यावर आपण सगळ्यात आधी काय करतो तर चहासाठी गॅसवर आधन ठेवतो. ब्रश झाला रे झाला की आपल्याला गरमागरम चहा पिण्याची वर्षानुवर्षे सवय असते. काही जण तर ब्रश न करताही चहा पितात (बेड टी). गरम चहा प्यायल्याने झोप जाऊन आपल्याला तरतरी येते खरी. भारतात अशाप्रकारे झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे सामान्य असले तरी आरोग्यासाठी रिकाम्या पोटी असा चहा पिणे अजिबात चांगले नसते. यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होतात. पाहूयात सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याचे आरोग्यावर काय परिणाम होतात. 

(Image : Google)

१. ब्लड प्रेशर  

ज्या लोकांना हाय ब्लडप्रेशरचा त्रास आहे अशांनी कधीच बेड टी घेऊ नये. कारण चहामध्ये असणारे कॅफीन शरीरात मिसळले जाते आणि त्यामुळे ब्लडप्रेशर वाढण्याची शक्यता असते. ब्लड प्रेशर हे अनेक आजारांचे मूळ असल्याने ब्लड प्रेशर वाढणे आरोग्यासाठी चांगले नसते. ब्लड प्रेशरमुळे हृदयरोगाच्या समस्या उद्भवतात. 

२. ताण दूर होण्याऐवजी वाढतो

चहा प्यायल्याने शुगर मिळते आणि आपला ताण कमी होण्यास मदत होते असे आपल्याला वाटते. पण प्रत्यक्षात चहा प्यायल्याने ताण कमी होण्याऐवजी वाढतो. चहामध्ये कॅफीन असल्याने तो प्यायल्या प्यायल्या झोप उडते. मात्र त्यामुळे ताण कमी होत नाही तर तो वाढण्याचीच शक्यता जास्त असते असे तज्ज्ञ म्हणतात.

३. अपचनाच्या तक्रारी

सकाळी उठल्या उठल्या चहा प्यायल्याने आपल्याला मोशन चांगली होते असे आपल्याला वाटते. मात्र चहामुळे गॅसेसच्या तक्रारी निर्माण होतात. तसेच चहामुळे पचनक्रिया मंदावते आणि पोटाच्या तक्रारी निर्माण होतात. त्यामुळे चहा दिवसभरात एक ते दोन वेळा प्यायलेला ठिक आहे पण सकाळी उठल्यावर अजिबात पिऊ नये. 

४. डायबिटीस होण्याची शक्यता

चहामध्ये जास्त प्रमाणात साखर असते. सकाळी चहा प्यायल्यावर शरीरातील साखरेची पातळी वाढण्याची शक्यता असते. शरीराच्या पेशींचे योग्य पद्धतीने पोषण न झाल्याने डायबिटीस होण्याची शक्यता वाढते. इतकेच नाही तर भविष्यात याचे शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतात. 

(Image : Google)

५. अल्सर

अल्सर ही पोटाची एक समस्या आहे. रात्रीच्या जेवणानंतर पोट बराच काळ रिकामे असते. त्यावर सकाळी एकदम चहा प्यायल्यास पोटातील आम्ल खवळल्यासारखे होते आणि त्यामुळे अल्सरसारखी समस्या उद्भवू शकते. त्यामुळे सकाळी उठल्यावर चहा पिणे शक्यतो टाळायला हवे.

टॅग्स : आरोग्यलाइफस्टाइलअन्न