एकीकडे हवामानात वेगाने बदल होत असताना या वातावरणाचा सामना करताना आपल्यातील अनेकांना सर्दी-खोकला होतो. सुरुवातीला हा संसर्ग सामान्य वाटत असला तरी तो लवकर बरा होत नसेल तर मात्र आपण वैतागून जातो. सर्दी किंवा खोकल्याने बेजार असलेल्या व्यक्तीला सगळेच नकोसे होऊन जाते. कधी शिंका येतात तर कधी घसा खवखवल्याने काय करावे सुचत नाही. काहींचे सतत नाक वाहते तर काहींचा घट्ट झालेला कफ बाहेरच पडत नाही. अनेकांना अशात तापही येतो. अशा एक ना अनेक तक्रारी घेऊन येणारा हा सर्दी-खोकला कधी एकदा बरा होतो याची आपण वाट पाहत असतो. या काळात अन्न नकोसे वाटते, उठून बसावे तर अंगात त्राण नसल्यासारखे होते आणि बाहेर जावे तर हा संसर्ग वाढण्याची भिती. त्यामुळे नेमके काय करावे कळत नसेल आणि लवकर बरे व्हायचे असेल तर सोपे घरगुती उपाय नक्की करुन बघा. त्यामुळे आराम मिळण्यास मदत होईल. कफ हा हळूहळू होत असून सुरुवात झाल्यावर लगेचच त्यावर उपाय करणे केव्हाही चांगले. दिर्घ काळ कफ राहिला तर त्यातून गंभीर आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आपल्याला कफ आणि सर्दी झाली आहे असे वाटल्यास लगेचच उपचारांना सुरुवात करावी.
१. सुंठ पावडर किंवा आलं, काळी मिरी, तुळशीची पाने, पान या सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी आहेत. पान घरात नसेल तरी इतर तीन गोष्टी तर आपल्याकडे नक्कीच असतात. हे पदार्थ पाण्यात १० मिनीटे चांगले उकळा. त्यानंतर गाळून त्याचे पाणी प्या, चवीला चांगले लागत नसेल तर त्यात थोडा गूळ घाला. दिवसातून दोन वेळा हा काढा प्यायल्यास त्याचा सर्दी-ताप जाण्यास अतिशय चांगला फायदा होतो. आलं किंवा सुंठ पावडर आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असून तिचा आहारात जरुर समावेश करायला हवा.
२. आल्याचा रस, मध आणि हळद यांचे मिश्रण करुन ते चाटण म्हणून घ्या. हळद प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असते तर मधामुळे घशाला सूदनिंग वाटते. त्यात आले घातल्याने सर्दी-कफ कमी व्हायला मदत होते. त्यामुळे आपल्याला सर्दी होणार आहे असे वाटल्यास लगेचच हे चाटण घ्या. त्यामुळे तुम्हाला त्वरीत आराम मिळण्यास मदत होईल.
३. गूळ, सुंठ पावडर आणि हळद या तिन्ही गोष्टी एकत्र करुन त्यांचे लहान लाडू करा आणि ते खा. यामुळे कफ बरा होण्यास मदत होईल. सकाळी आणि रात्री झोपताना ही गोळी खाल्ल्यास नक्कीच फरक जाणवेल. यातही तुमच्या घशाला सतत कोरड पडत असेल तर यात थोडे तूप घातले तरी चालेल. कोरड्या कफासाठी हा अतिशय चांगला उपाय आहे.
४. मीठाच्या पाण्याने गुळण्या करणे हा सर्दी, खोकला आणि खवखवणाऱ्या घशासाठी अतिशय चांगला उपाय आहे. यामध्ये आपण थोडी हळद घातली तरी चालेल, कारण हळदीमुळे घशातील विषाणू मरण्यास मदत होईल. हे कोमट पाण्याने केल्यास चांगले, पण साध्या पाण्यानेही करु शकता. नाक आणि घशाच्या सगळ्याच भागाला यामुळे आराम मिळण्यास मदत होते.
५. कोमट पाणी पिणे हा सर्दी-खोकला किंवा घशासाठी उत्तम उपाय ठरु शकतो. कोमट पाण्यामुळे शरीराला अनावश्यक असणारे घटक शरीराच्या बाहेर फेकले जाण्यास मदत होते. त्यामुळे सर्दी-कफ बाहेर पडण्यास मदत होते. हा अतिशय सोपा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय असून तो थंडीच्या दिवसांत किंवा साथी असताना नक्की करा.