पोटाचं कार्य सुरळीत असेल तर आपल्या आरोग्याचे बहुतांश प्रश्न सुटतात. पण पोटच नीट नसेल तर मात्र आरोग्यावर त्याचे बरेच परीणाम झालेले पाहायला मिळतात. आपल्याला अनेकदा बद्धकोष्ठता, गॅसेस, अपचन, अॅसिडीटी यांसारखे त्रास होतात. हे त्रास बरेचदा पोट नीट साफ न झाल्याने होतात. पोटाच्या तक्रारी असतील तर त्वचेवर आणि केसांतूनही त्याची लक्षणे दिसून येतात. त्यामुळे नकळतच पोटाच्या आरोग्याचा आपल्या सौंदर्यावरही परीणाम होतो हे लक्षात घ्यायला हवे. काहीवेळी पोट साफ होण्यासाठी किंवा पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यासाठी आपण घरगुती उपाय करतो किंवा थेट डॉक्टरांकडे जातो. मात्र आपल्या रोजच्या आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश केल्यास पचनाशी निगडीत तक्रारी दूर होण्यास मदत होते. प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. दिक्षा भावसार याविषयी काही महत्त्वाच्या टिप्स सांगतात. आहारात कोणत्या ५ गोष्टींचा समावेश केल्यास आपले आरोग्य चांगले राहू शकेल, पाहूया (5 Gut Healing Herbs Home Remedies for Digestion Problems)...
१. बडीशोप
बडीशोप ही बाजारात सहज मिळणारी गोष्ट आहे. आपण हॉटेलमध्ये जातो तेव्हा जेवण झाल्यावर आवर्जून बडीशोप खातो. मात्र घरात किंवा ऑफीसमध्ये असताना बडीशोप खाणे आपल्या लक्षात राहतेच असे नाही. बडीशोप ही तोंडाला येणारा वास जाण्यासाठी महत्त्वाची असली तरी पोटाचे आरोग्य चांगले राहण्यासाठीही ती तितकीच महत्त्वाची असते. नुसती खाणे लक्षात राहत नसेल तर चहामध्ये बडीशोप घालणे हा उत्तम उपाय ठरु शकतो. यामुळे पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते.
२. वेलची, जीरं आणि ओवा
हे तीन घटक पाण्यामध्ये उकळून ते पाणी प्यायल्यास आरोग्यासाठी ते अतिशय फायदेशीर असते. ज्यांना पोटात गोळे येतात, खाल्लेले अन्न पचत नाही, गॅसेसचा त्रास होतो त्यांच्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो. गॅसेसमुळे पोटात दुखत असेल तर १ चमचा ओवा चावून खावा. त्यासोबत काळे मीठ आणि कोमट पाणी घेतल्यास गॅसेसचा त्रास दूर होण्यास मदत होते. ज्यांना गॅसेस होतात त्यांनी जेवणानंतर हा उपाय अवश्य करावा.
३. हिंग
हिंगामुळेही गॅसेसचा त्रास दूर होण्यास मदत होते. त्यामुळे कोणतीही भाजी करताना त्यामध्ये चिमूटभर हिंग आवर्जून घालावे. त्यामुळे पोटात अडकलेला गॅस मोकळा होण्यास मदत होते. लहान मुलांना गॅसेस होत असल्यास बेंबीच्या बाजूला हिंगाची पेस्ट लावतात.
तुमच्या स्वयंपाकघरात अन्नामध्ये औषधी गोष्टी असताना औषधे खरेदीसाठी बाहेर जाण्याची आवश्यकता काय असा प्रश्नही डॉ. भावसार आपल्या इन्स्टाग्राम पोस्टच्या शेवटी विचारतात. हे सगळे उपाय अतिशय उत्तम असून सोपे असल्याचेही त्या आपल्या पोस्टला कॅप्शन देताना म्हणतात. दिक्षा नेहमीच आपल्या फॉलोअर्ससाठी काही ना काही माहितीपूर्ण पोस्ट करत असतात. त्यामुळे आरोग्याबाबत जागरुकता निर्माण करण्याचे अतिशय महत्त्वाचे काम त्या करतात.