डायबिटीस ही सध्या अतिशय सामान्य समस्या झाली आहे. अगदी तरुण वयात होणारा हा डायबिटीस वेळीच नियंत्रणात ठेवला नाही तर भविष्यात आरोग्याची गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत असेल तर त्याचा आपली किडनी, यकृत, हृदय यांसारख्या अवयवांवर परिमाण होतो आणि परिणामी हे अवयव निकामी होत जातात. एकदा हे अवयव निकामी व्हायला लागले की त्यावर कोणताच उपाय नसल्याने वेळीच योग्य ती काळजी घेतलेली केव्हाही चांगली. त्यामुळे किडनीचे कार्य सुरळीत ठेवायचे असेल तर डायबिटीसच्या रुग्णांनी आवर्जून लक्षात ठेवायला हव्यात अशा ५ गोष्टी कोणत्या याबाबत किडनीरोगतज्ज्ञ आणि ट्रान्सप्लांट स्पेशालिस्ट डॉ. तरुण जेलोका काय सांगतात ते पाहूया (5 Habits to Boost Kidney Health for Diabetes Patients)...
१. रक्तातील साखर नियंत्रणात हवी
रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणे हे डायबिटीस असणाऱ्या रुग्णांपुढेल सर्वात मोठे आव्हान असते. मात्र आहार, व्यायाम आणि औषधोपचार यांच्या योग्य कॉम्बिनेशनने डायबिटीस रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला हवी.
२. रक्तदाबावर नियंत्रण हवे
डायबिटीस असणाऱ्या बहुतांश रुग्णांना उच्च रक्तदाबाचा त्रास असतो. उच्च रक्तदाबामुळेही किडनीवर विपरीत परिणाम होऊन तिच्या कार्यात अडथळा येण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात ठेवणे ही आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे.
३. तंबाखूपासून दूर राहणे
कोणत्याही स्वरुपातील तंबाखूचे सेवन करणे हे केवळ हृदयासाठी नाही तर किडणीसाठीही घातक असते. त्यामुळे तुम्हाला डायबिटीस असेल तर तुम्ही तंबाखूपासून अवश्य दूर व्हायला हवे.
४. जीवनशैलीतील बदल
नियमितपणे व्यायाम करणे, आहारात कमीत कमी मिठाचा समावेश करणे आणि वजनावर नियंत्रण ठेवणे याही काही महत्त्वाच्या गोष्टी असून किडनीचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी या गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे.
५. औषधोपचार
बाकी सगळ्या गोष्टी आपण करत असलो तरी डायबिटीस असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे योग्य ते औषधोपचार घेणेही तितकेच गरजेचे आहे. औषधांमुळेही आपली शुगर आणि बीपी नियंत्रणात राहण्यास मदत होते. त्यामुळे नियमित डॉक्टरांकडे जाणे आणि योग्य ती औषधे घेणे आवश्यक आहे.