Join us   

घामानं होणाऱ्या फंगल इन्फेक्शनवर 5 घरगुती उपाय; दही- लसूण -हळदीच्या उपचारानं घामाचे विकार होतील दूर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2022 6:12 PM

घामामुळे उद्भवणारे बुरशीजन्य त्वचा विकार घरगुती उपायांनी बरे करता येतात. यासाठी घरातील दही, लसूण, हळद, खोबऱ्याचं तेल याद्वारे घरच्याघरी उपचार करता येतात.

ठळक मुद्दे दह्याद्वारे घामानं होणारा बुरशी संसर्ग आटोक्यात आणता येतो. हळदीच्या पूडपेक्षा हळकुंडाचा उपाय जास्त परिणामकारक ठरतो. खोबऱ्याच्या तेलातील फॅटी ॲसिड कोणत्याही प्रकारच्या संसर्गावर उपयुक्त ठरतं. 

शरीरातील विषारी घटक घामाद्वारे बाहेर टाकली जातात, त्यामुळेच घाम येणं हे चांगलं असतं. पण उन्हाळ्यात सतत येणाऱ्या घामामुळे मात्र इतर समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात घामानं सतत अंगं ओलं राहिल्यानं बुरशीजन्य समस्या निर्माण होतात. विशेषत हाता पायांच्या बोटांच्या त्वचेला, मानेला, काखेत, काखेच्या सभोवती फंगल इन्फेक्शन होतं. ते होवू नये यासाठी वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचं तज्ज्ञ सांगतात.

 Image: Google

घामामुळे उद्भवणारे बुरशीजन्य त्वचा विकार घरगुती उपायांनी बरे करता येतात. यासाठी घरातील दही, लसूण, हळद, टी ट्री ऑइल आणि खोबऱ्याचं तेल या सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टींतून घरच्याघरी उपचार करता येतात. 

Image: Google

1. दही दह्याद्वारे बुरशी संसर्ग आटोक्यात आणता येतो. घामामुळे शरीरावर कुठेही लाल पुरळ येवून खाज सुटल्यास तिथे दही लावावं. दही लावून ते अर्धा तास ठेवावं. दिवसातून दोन वेळ दही लावल्यास पुरळ आणि खाज जाते.

Image: Google

2. लसूण लसणामध्ये तीव्र जिवाणू आणि बुरशी विरोधी गुणधर्म असतात. घामोळ्या किंवा घामानं निर्माण होणाऱ्या त्वचा विकारावर लसणाचा उपाय प्रभावी ठरतो. लसणाचा उपचार करताना लसूण बारीक वाटावा. वाटलेल्या लसणामध्ये ऑलिव्ह ऑइल घालावं. हे मिश्रण जिथे घामानं संसर्ग झालाय तिथे लावाव्ं. अर्ध्या तासानं ती जागा पाण्यानं धुवावी.

Image: Google

3. हळद घामामुळे झालेला संसर्ग कमी प्रमाणात असला तर हळदीचा लेपही असरदार ठरतो. यासाठी हळद घेऊन ती पाण्यानं भिजवावी आणि तो लेप संसर्ग झालेल्या ठिकाणी लावावा आणि थोड्या वेळानं पाण्यानं ती जागा धुवावी. हळदीच्या पूडपेक्षा हळकुंड उगाळून ते संसर्गावर लावल्यास ते जास्त परिणामकारक ठरतं.

Image: Google

4. टी ट्री ऑइल घामानं झालेल्या संसर्गावर टी ट्री ऑइल काम करतं. पण संसर्गाच्या ठिकाणी थेट टी ट्री ऑइल वापरु नये.  थोडं बदामाचं किंवा ऑलिव्ह तेल घ्यावं. त्यात 4-5 थेंब टी ट्री ऑइल घालावं. ते चांगलं मिसळून संसर्गाच्या ठिकाणी लावावं. अर्ध्या तासानंतर पाण्यानं ती जागा स्वच्छ धुवावी.

Image: Google

5. खोबऱ्याचं तेल खोबऱ्याच्या तेलात असलेल्या फॅटी ॲसिडमुळे त्वचेवर झालेल्या कोणत्याही प्रकारचा संसर्ग बरा होतो . यासाठी संसर्ग झालेल्या ठिकाणी खोबऱ्याचं तेल दोन ते तीन वेळा लावावं.  

टॅग्स : हेल्थ टिप्सत्वचेची काळजीसमर स्पेशल