ब्रेन स्ट्रोक म्हटले की मेंदूला झालेला आघात हे आपल्याला समजते पण हा आघात नेमका कोणत्या कारणांनी होतो हे अद्याप समजू शकलेले नाही. यामागे असंख्य कारणे असून आपल्या जीवनशैलीतील चुकीच्या सवयींमुळे ब्रेन स्ट्रोकचा धोका वाढतो. मेंदूला होणारा रक्तपुरवठा तसेच ऑक्सिजनचा पुरवठा अनियमित झाल्याने अशाप्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जगात २५ वर्षाच्या वरील प्रत्येक ४ व्यक्तींमागे १ व्यक्ती ही ब्रेनस्ट्रोकने मृत्यू पावत असल्याचे किंवा अपंगत्व येत असल्याचे गेल्या काही वर्षाच्या आकडेवारीवरुन समोर आले आहे. वय झालेल्या व्यक्तींमध्येही मेंदूचे कार्य सुरळीत नसल्याने वाढणाऱ्या समस्यांचे प्रमाण जास्त आहे.
तुमचं वय काय आहे किंवा तुमच्या कुटुंबाचा ब्रेन स्ट्रोकबाबतचा इतिहास काय आहे, हे तर लक्षात घ्याच पण त्याबरोबरच जीवनशीलीतील नेहमीच्या काही सवय जरुर बदला. त्याचा तुम्हाला मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यास निश्चितच फायदा होईल. कोविडमुळे आपल्या सगळ्यांचीच जीवनशैली अचानक खूप बदलली आहे. वर्क फ्रॉम होम, जीम, उद्याने बंद असल्याने आपण चार भिंतीत कोंडले गेल्यासारखे झाले आहे. मात्र काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिल्यास मेंदूशी निगडीत तक्रारींचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. पाहूया कोणत्या सवयी बदलायला हव्यात याविषयी...
१. आहाराबाबत काळजी घ्यायला हवी
चांगला पोषक आहार घेणे मेंदूचे आरोग्य चांगले राहण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. त्यामुळे तुम्हाला ब्रेन स्ट्रोक होण्याचा धोका ८० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन, कॅलरीज, खनिजे असा सर्व समावेशक आणि संतुलित आहार असणे आवश्यक आहे. यामुळे स्ट्रोक आणि हृदयाशी संबंधित तक्रारी कमी होण्यासही मदत होते. सोडीयम, मीठ, सॅच्युरेटेड फॅटस, साखर यांचे आहारातील प्रमाण कमी केल्यास तुमचा रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर यांचे संतुलन राहते आणि तब्येत चांगली राहण्यास मदत होते.
२. आळशीपणाचा स्ट्रोकशी जवळचा संबंध
शारीरिक हालचाली न करणे आणि सतत वेगवेगळ्या प्रकारच्या गॅजेटसमध्ये किंवा सोशल मीडियावर वेळ घालवणे हे तरुणांमध्ये अगदी सामान्य झाले आहे. मात्र अशाप्रकारच्या आळसामुळे बॉडी फॅट वाढते, स्नायूंची ताकद कमी होते. तसेच आळशीपणा आणि सततची बैठी जीवनशैली यांचा परिणाम म्हणजे हाडांचा ठिसूळपणा, मेटाबॉलिझमशी निगडीत तक्रारी असे परिणाम दिसून येतात. त्यामुळे आता तुमच्याकडून दिवसभरात काहीच अॅक्टीव्हिटी होत नसतील तर किमान अर्धा तासासाठी चालणे, जीने चढउतार करणे अशा अॅक्टीव्हिटी सुरू करायला हव्यात. त्यामुळे ब्रेन स्ट्रोकसारख्या तक्रारींचा धोका कमी होऊ शकतो.
३. व्यसनांचे प्रमाण कमी करणे
धूम्रपान, तंबाखू खाणे यांसारख्या व्यसनांमुळे स्ट्रोकशी संबंधित तक्रारी वाढतात. भारतासारख्या देशात तंबाखू खाणाऱ्यांचे आणि धूर्मपान करणाऱ्यांचे प्रमाण खूप जास्त असून कमी वयापासून ही व्यसने करणाऱ्यांची संख्याही जास्त आहे. तंबाखूमध्ये ७ हजारहून अधिक टॉक्सिक रसायने असतात. तसेच दारुचे व्यसन असणाऱ्यांची संख्याही जगभरात जास्त असल्याने या व्यसनामुळेही मेंदूचा पक्षाघात होण्याची शक्यता वाढते. यामुळे फुफ्फुसे निकामी होणे, शरीरातील पेशी खराब होणे आणि ब्रेन स्ट्रोक यांसारख्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे व्यसने न करणे हा सर्वोत्तम उपाय आहे, एकदम व्यसन बंद करणे शक्य नसले तरी हळूहळी कमी करणे शक्य असते, त्याचा सकारात्मक विचार करायला हवा, यामुळे तुमचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होईल.
४. दुर्लक्ष करणे पडू शकते महागात
आपल्याला कोलेस्टेरॉल, रक्तबाब, शुगर यांसारख्या कोणत्याही प्रकारच्या शारीरिक तक्रारी असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्यायला हवे. अशा तक्रारींकडे बराच काळ दुर्लक्ष केल्यास त्याचा परिणाम म्हणजे ब्रेन स्ट्रोकसारख्या गंभीर समस्येला आमंत्रण देण्यासारखेच आहे. त्यामुळे तुम्हाला आरोग्याच्या कोणत्याही लहान-मोठ्या तक्रारी असतली तर वेळीच तज्ज्ञांचा वेळीच सल्ला घ्या आणि त्यावर योग्य ते उपचार करा. आरोग्याची नियमित तपासणी करणे, औषधोपचार घेणे या अतिशय गरजेच्या गोष्टी असून त्याकडे लक्ष द्यायला हवे.